Mumbai: लोकप्रिय गायक Rahul Jain याच्यावर बलात्काराचा आरोप, FIR दाखल; 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'ला घरी बोलावून केले लैंगिक अत्याचार
बॉलीवूडमधील एका गीतकार आणि लेखक महिलेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल जैन याच्याविरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोपांवर एफआयआर दाखल केला होता.
बॉलीवूड गायक-संगीतकार राहुल जैन (Rahul Jain) याच्याविरुद्ध 30 वर्षीय महिला 'कॉस्च्युम स्टायलिस्ट'ने बलात्कार (Rape) केल्याचा आरोप करत, एफआयआर दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. एफआयआरचा हवाला देत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या आपल्या जबानीत म्हटले आहे की, जैन याने त्याच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला होता. तिच्या कामाचे कौतुक करत जैनने महिलेला आपल्या अंधेरी येथील फ्लॅटवर बोलावले व तिचे तिच्यावर अत्याचार केला.
मात्र गायकाने हे आरोप फेटाळले असून, ते ‘खोटे आणि निराधार’ असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, महिला 11 ऑगस्ट रोजी जैन याच्या फ्लॅटवर गेली होती. आपले घर दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला आपल्या बेडरूममध्ये नेले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्वतंत्र 'कॉस्च्युम स्टायलिस्ट' म्हणून काम करते. महिलेने सांगितले की, तिने विरोध केल्यावर जैन याने तिला मारहाण करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376, 323 आणि 506 अंतर्गत जैन याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाबाबत जैन याच्याशी संपर्क साधला असता, त्याने या महिलेला ओळखण्यास नकार दिला. आपण या महिलेला ओळखत नाही, असे त्याने सांगितले. तो म्हणाला, यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. कदाचित ही महिला तिची सहकारी असू शकते. (हेही वाचा: अभिनेता रणवीर सिंगच्या घरी पोहोचले पोलीस; न्यूड फोटोशूट प्रकरणी अडचणी वाढल्या)
बॉलीवूडमधील एका गीतकार आणि लेखक महिलेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राहुल जैन याच्याविरोधात बलात्कार, जबरदस्ती गर्भपात आणि फसवणूक यासह विविध आरोपांवर एफआयआर दाखल केला होता. दरम्यान, राहुल जैन हा एक भारतीय गायक, संगीतकार आणि गीतकार आहे, जो प्रामुख्याने त्याच्या बॉलीवूड आणि भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. 2016 च्या हिंदी चित्रपट फिव्हरमधील त्याच्या 'तेरी याद' या गाण्याने त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.