MGNREGA Fraud: मनरेगा जॉब कार्ड्सवर Deepika Padukone, Jacqueline Fernandez या बॉलिवूड अभिनेत्रींचे फोटोज; फेक कार्ड्चा घोटाळा उघडकीस
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस आणि दिया मिर्झा यांच्या फोटोजचा वापर फेक ऑनलाईन जॉब कार्डवर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरनोग जिहल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ही सरकारी योजनेअंतर्गत देण्यात आलेले जॉब कार्ड्स खोटे असल्याचे समोर आले आहे. या जॉब कार्ड्सवर चक्क बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि दिया मिर्झा (Dia Mirza) यांच्या फोटोजचा वापर करण्यात आला आहे. झिरनिया पंचायतमधील दुर्गम पेपरखेडा नाका मधील तब्बल 11 लोकांच्या जॉब कार्ड्सवर बॉलिवूड अभिनेत्रींचे फोटोज आहेत. यापैकी बहुतांश कार्ड्स हे पुरुष लाभार्थींचे आहेत. या प्रकरणात पंचायत सचिव आणि रोजगार सहाय्यकांचा सहभाग असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे. दरम्यान, अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
"जॉब कार्डवर बॉलिवूड कलाकारांचे फोटोज असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. हे कार्ड खरे आहेत का? तसंच कोणत्या आधारावर हे फोटोज छापण्यात आले आहेत, याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी समितीने अनियमितता नोंदवल्यास दोषींवर कारवाई केली जाईल", असे CEO गौरव बेनाल (जिल्हा पंचायत खरगोन) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पहा ट्विट:
हे कार्ड वापरून पैसे काढण्यात आल्याचे समजल्यानंतर सर्व लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मोनू शिवशंकर यांनी सांगितले की, "मनरेगा अंतर्गत ते कोणत्याही कामासाठी जात नाहीत आणि जॉब कार्डवर दीपिका पादुकोणचा फोटो पाहून त्यांना आश्चर्य वाटले." तर पदम रूपसिंग ज्याच्या जॉब कार्डमध्ये दीया मिर्झाचा फोटो आहे. त्यांनी सांगितले की, "गावचे सरपंच किंवा इतर कोणी नोकरी देत नाहीत." सोनू शांतीलाल यांच्या नावावर असलेल्या जॉब कार्डवर जॅकलिन फर्नांडिजचा फोटो आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामीण घरात आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांची मजुरी व्यवस्था उपलब्ध करुन देणे, हा यामागील उद्देश आहे.