कमल हासन यांच्या Indian 2 सिनेमाच्या सेटवर क्रेन कोसळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर 10 जण जखमी

शूटिंग दरम्यान क्रेन कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत.

Crane collapsed on the set of movie Indian 2 (Photo Credit: Twitter)

तामिळ अभिनेता कमल हासन (Kamal Hassan) यांचा आगामी सिनेमा इंडियन 2 (Indian 2) च्या सेटवर भीषण अपघात झाला. शूटिंग दरम्यान क्रेन कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर या अपघातात दिग्दर्शकाचा पर्सनल असिस्टंट मधू (29), साहाय्यक दिग्दर्शक कृष्णा (34) आणि एक कर्मचारी चंद्रन (60) यांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन 2 या सिनेमाचे शूटिंग चेन्नई जवळील ईव्हीपी एस्टेट स्पॉटवर सुरु होते. शूटिंग सुरु असताना रात्री दहाच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

ANI ट्विट:

अपघातादवेळी अभिनेता कमल हासन सेटवरच उपस्थित होते. ते सुखरुप असून त्यांनी ट्विट करुन अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आज पाहिलेला अपघात हा माझ्या करिअरमधील कधीही न पाहिलेला भीषण अपघात होता. मी माझे तीन सहकारी गमावले. पण त्यांच्या नातेवाईकांचे दु:ख त्याहून मोठे आहे. या दु:खात मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहे, अशा आशयाचे ट्विट कमल हासन यांनी केले आहे.

कमल हसन यांचे ट्विट:

तसंच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली. जखमी झालेले माझे सहकारी लवकर बरे होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.