Tadoba Festival 2024: येत्या 1 ते 3 मार्च दरम्यान 'ताडोबा महोत्सवा'चे आयोजन; कवी संमेलन, ट्रेझर हंट स्पर्धा, नृत्य सादरीकरणासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

Tadoba Festival 2024 (संग्रहित संपादित प्रतिमा)

वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर येथे ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या (Tadoba-Andhari Tiger Reserve) वतीने, १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे (Tadoba Festival) आयोजन करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी एकाच दिवशी सर्वाधिक वृक्ष लागवडीचा विश्व विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली. ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. हा महोत्सव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध ठिकाणी होणार आहे. ताडोबा उत्सव शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. हा कार्यक्रम केवळ वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत नाही, तर वन्यजीवांसोबत स्थानिक समुदायांची भूमिका देखील अधोरेखित करतो. पर्यटन पद्धतींना प्रोत्साहन देऊन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आम्ही केवळ आमच्या मौल्यवान परिसंस्थांचेच रक्षण करत नाही तर आर्थिक वाढ आणि स्थानिक समुदाय सशक्तीकरणाच्या संधीही निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग प्रश्नमंजुषा, पारंपरिक नृत्य सादरीकरण, लघुपट सादरीकरण आणि श्रेया घोषालचे गीत सादरीकरण उद्घाटनाच्या दिवशी असणार आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, फोटोग्राफी कार्यशाळा, चॅरिटी रन, चर्चासत्रे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. जगातील सर्वात जास्त वृक्षारोपण कार्यक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा या दिवशी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे. रिकी केज सारख्या नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने आणि कवी संमेलन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाची या उत्सवात रेलचेल राहणार आहे. (हेही वाचा: Save the Tiger Campaign: महाराष्ट्र सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला Miss World च्या टीमचा पाठिंबा; वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात होणार अधिक जागृती)

कार्यक्रमाच्या ३ ऱ्या दिवशी, सहभागींना ट्रेझर हंट स्पर्धा, सायक्लोथॉन, चित्रकला स्पर्धा, वन्यजीव प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सीएसआर कॉन्क्लेव्ह यासह विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी यांच्या समूहाचा गंगा बॅले कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली.