Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो गणेशोत्सवाच्या काळात सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, ही बहुप्रतिक्षित सेवा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
Hinjewadi to Shivajinagar Metro Start Date: पुणेकरांसाठी आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो मार्गिका ३ (Pune Metro Line 3) चा पहिला टप्पा येत्या सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळातच पुणेकरांना या मेट्रो सेवेची भेट मिळू शकते, अशा हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत.
पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण
हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण मार्ग २३.३ किलोमीटर लांबीचा असून तो दोन टप्प्यांत कार्यान्वित केला जात आहे. यातील माण ते बालेवाडी (आर. के. लक्ष्मण संग्रहालय) दरम्यानचा १३.३ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
या पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांसाठी आवश्यक असलेली मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) तांत्रिक व सुरक्षेची मंजुरी आधीच प्राप्त झाली आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता केवळ अधिकृत उद्घाटनाची औपचारिकता बाकी आहे.
गणेशोत्सवादरम्यान उद्घाटनाचे संकेत
सुरुवातीला हा टप्पा जुलै किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, उद्घाटनाची अधिकृत तारीख निश्चित न झाल्यामुळे ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि राज्य शासनाकडून या मार्गाच्या उद्घाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच पार्श्वभूमीवर सणासुदीच्या दिवसांत ही मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्याचे संकेत मिळत आहेत.
सध्याच्या घडीला शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासासाठी रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. विद्यापीठ चौक, बाणेर आणि वाकड परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ आणि इंधनाची बचत होणार असून, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.