मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पहिला दौरा; शिवनेरी वर मोठी घोषणा करण्याची शक्यता
हा दौरा शिवनेरी किल्ल्यावर असून या दौ-यासाठी विशेष तयारी करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर आज ते त्यांचा पहिला दौरा करणार आहे. हा दौरा शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort)असून या दौ-यासाठी विशेष तयारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच दौरा असल्याने उद्धव ठाकरे ही खूप उत्सुक आहेत. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थळ असून या ठिकाणी उद्धव ठाकरे राज्यातील जनतेच्या दृष्टीने एखाद्या मोठ्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवनेरी दौरा हा या किल्ल्यासाठी विशेष असणार आहे. त्यात हा पहिलाच दौरा असल्याने नागरिकांच्या तसेच या किल्ल्याच्या दृष्टीने असा महत्त्वाचा निर्णय घेण्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आधी एकवीरा देवीचे दर्शन घेणार असून त्यानंतर शिवनेरी गडावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राज्यातील सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असल्याचे म्हटले होते. सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, तसेच, कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असेही ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्भया निधीच्या वापरासाठी तात्काळ नियोजन करण्याचे आदेश
सध्या महाविकास आघाडी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कधी घोषणा करणार याकडे राज्याचे लक्ष लागले असून, कदाचित याबाबतची वा जनतेच्या दृष्टीने आणखी एखादी महत्त्वाची घोषणा होईल, असा अदांज वर्तविला जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात खाते वाटप न होऊनही याआधी अनेक महत्त्वाचे निर्णय ठाकरे सरकार ने घेतले आहे. ज्यात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी तसेच 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना यास मान्यता यांसारखे निर्णयांचा समावेश आहे.