Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य अखेर पूर्ण; मृतांचा आकडा 16 वर, 75 जखमी
या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७५ जण जखमी झाले आहेत.
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील (Ghatkopar Hoarding Collapse) बचावकार्य 60 तासांनंतर पूर्ण झाले आहे. त्याबाबतची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 75 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली आता कोणीही अडकले नसल्याची आणि केवळ मलाबा हटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुंबई पालिकेने दिली. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर तेथे सलग दोन दिवस बचाव कार्य सुरू (Mumbai News) होते.
घाटकोपरमधील छेडानगर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून 13 मे रोजी दुपारी चार वाजता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ही दुर्घटना घडली होती. त्या दरम्यान, पाऊस सुरू झाल्याने अनेक जण पंपावर थांबले होते. त्याशिवाय,वाहनात पेट्रोल भरण्यासाठीही काही नागरिक आले होते. त्यावेळी ही घटना घडली. अनेकजण या होर्डिंगखाली दबले गेले होते. मागील तीन दिवसांपासून घटनास्थळी एनडीआरएफ टीम, सेन्सर आणि श्वानपथकाच्या साहाय्याने या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं आहे का? याचा शोध घेत होते.
या बचावकार्यामध्ये मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, एनडीआरएफ, एमएमआरडीए, महानगर गॅस या यंत्रणांनी मोठी भूमिका बजावली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या कुंटुबीयांना सरकारकडून त्वरित प्रत्येकी पाच लाखाची मदत देण्यात येणार आहे. या दुर्घटनेनंतर अनेक शहरातील प्रशासने अलर्ट मोडवर आली आहेत. अनधिकृत होर्डिंग हटवण्याचं काम मानिसून आगमनाच्या पार्श्वभूमीवर जलद वेगाने सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत पुण्यात अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ही अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत.