मुंबई: चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एकाला विमानतळावरुन अटक
राहत अली असं या आरोपीचं नाव असून तो भारताचा नागरिक आहे.
चप्पलमधून सोनं तस्करी करणाऱ्या आरोपीला एसीआयएसएफने (CISF) मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport) ताब्यात घेतलं आहे. राहत अली (Rahat Ali) असं या आरोपीचं नाव असून तो भारताचा नागरिक आहे.
51 वर्षीय राहत अली बहरीनहून दिल्लीला प्रवास करत होता. मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर तपासणीदरम्यान त्याच्या चप्पलमध्ये धातू असल्याचं समजलं. त्यानंतर सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी चप्पल एक्स-रे मशीनमध्ये चेक केली. त्यात चप्पलच्या सोलमध्ये सोन्याचे बार आढळून आले.
तपासादरम्यान याबाबतची कोणतीही वैध कागदपत्रे राहत अली याला दाखवता आली नाहीत. सीआयएसएफने हे सोन्याचे बार जप्त करत आरोपीला कस्टम विभागाच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून कस्टम कायद्याअंतर्गत त्याच्यावर तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहत अली याच्याकडे मिळालेल्या दोन सोन्याचे बार हे 381 ग्रॅम वजनाचे असून त्यांची किंमत अंदाजे 11 लाख 12 हजार 139 रुपये असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.