Coronavirus in Mumbai: मुंबईत 1298 रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 62,799 वर
तसेच आज दिवसभरात 518 रुग्ण बरे झाले असून मुंबईत आतापर्यंत एकूण 31,856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,20, 504 वर पोहोचली आहे. तर राज्यात सर्वाधिक कोविड-19 (COVID-19) रुग्ण असलेल्या मुंबई शहरात आज 1298 नवे रुग्ण आढळले असून मुंबईत (Mumbai) कोरोना रुग्णांची एकूण संख्या 62,799 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 67 नवे रुग्ण दगावले असून शहरात मृतांचा एकूण आकडा 3,309 वर पोहोचला आहे. तसेच आज दिवसभरात 518 रुग्ण बरे झाले असून मुंबईत आतापर्यंत एकूण 31,856 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य घडीला मुंबईत 27,634 रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.
धारावीत (Dharavi) आज 28 जणांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2134 वर पोहोचली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. आतापर्यंत धारावीत 78 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. धारावीत बुधवारी एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे. धारावीत आतापर्यंत 1,053 कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईत कोरोना व्हायरस ची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
भारतामध्ये आता कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 3 लाख 66 हजार 946 पर्यंत पोहचला आहे. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, देशात 17 जून पर्यंत 62,49,668 सॅम्पल्स तपासले आहेत. मागील 24 तासामध्ये 1,65,412 सॅम्पल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.