Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi: मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी

आज 24 नोव्हेंबरला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त काही घरांमध्ये घटाच्या रूपात लक्ष्मीची मांडणी करून पूजा करण्याची पद्धत आहे. व्रतामध्ये वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात. आम्ही तुमचीसाठी पूजा विधी घेऊन आलो आहोत. पाहा

देवी लक्ष्मी, (File Photo)

Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi in Marathi: हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष  महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मीचे व्रत करण्याची प्रथा आहे. यंदा आज 24 नोव्हेंबरला मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त काही घरांमध्ये घटाच्या रूपात लक्ष्मीची मांडणी करून पूजा करण्याची पद्धत आहे.  व्रतामध्ये वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठण करतात. स्त्रीया हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. आम्ही तुमचीसाठी पूजा विधी घेऊन आलो आहोत. पाहा [हे देखील पाहा: Margashirsha Guruvar Vrat Katha: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची कथा नेमकी काय?]

मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधी व घट मांडणी (Margashirsha Guruvar Vrat Puja Vidhi) 

घट मांडणार त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा. चौरंगावर नवीन कापड अंथरावे. कापडावर गहू वा तांदूळ यांची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. कलशमध्ये दूर्वा, पैसा आणि सुपारी, विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा. पाटावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी. मूर्तीपुढे फुले, विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा. 

घट मांडल्यावर सर्व कुटुंबासमवेत श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचावी. कथा संपन्न झाल्यास आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा. पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर भोजन करावे. 

पूजा करणाऱ्याने कोणत्या नियमांचे पालन करावे, जाणून घ्या 

पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दुध आणि फळांचे सेवन करावे, या दिवसात घरात मांसाहार करू नये. दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा, फुले आणि विड्याची पाने विसर्जित करावी. तर कलशातील पाणी तुळशीला घालावे. दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी सवाष्णींना हळदीकुंकू, फळे देऊन इतर वाण दिले जाते. 

मार्गशीर्ष गुरुवार व्रत नियम

  •  ही पूजा शक्य तितक्या प्रातःकाळी करावी.
  • दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवैद्य दाखवून मगच उपवास सोडावा
  • या व्रतात खंड पाडू नये, काही आकस्मिक अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्याने उपवास व पूजा करावी.
  • महालक्ष्मी  व्रताची कथा आवर्जून वाचावी. 
  • सात कुमारिकांना वा सवाष्ण स्त्रियांना हळदी- कुंकू, फळं, द्यावीत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मी व्रत पाठाची पुस्तके वाटावीत.

दरम्यान मार्गशीर्ष गुरूवार या व्रताचे जो पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त टिकून राहतो. परिणामी धनधान्य, समृद्धी यांची वृद्धी होत राहते.

(टीप- या लेखाचा उद्देश माहिती देणे हा आहे,  लेटेस्टली मराठी कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही तसेच अंधश्रद्धा पसरवू इच्छित नाही)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement