आरोग्य सेतू अॅप कोणी बनवला? याचे उत्तर NIC कडे नाही; RTI कडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
मात्र आता हा अॅप नेमका कोणी बनवला? असा प्रश्न उभा राहिला आहे.
भारतातील कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून आरोग्य सेतू अॅप तयार करण्यात आला. मात्र आता हा अॅप नेमका कोणी बनवला? असा प्रश्न उभा राहिला आहे. आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या वेबसाईटवर हा अॅप राष्ट्रीय माहिती केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय या दोन सरकारी विभागांकडून विकसित केल्याचे म्हटले आहे. परंतु, RTI कार्यकर्ता सौरव दास यांनी प्रश्न उभा केल्यानंतर दोन्ही सरकारी विभागांनी या अॅपच्या निर्मितीबद्दल माहिती असल्याचे नाकारले आहे.
Live Law च्या रिपोर्टनुसार, सरकारच्या दोन्ही विभागांच्या या उत्तरानंतर केंद्रीय माहिती आयोग आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. आरोग्य सेतू अॅपबद्दलची ही शंका आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर शंका राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाकडे ट्रान्सफर करण्यात आली. दरम्यान, ही माहिती आमच्या विभागाची नसल्याचे सांगण्यात आल्याचे एनडीटीव्हीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसंच आरोग्य सेतू अॅप निर्मितीच्या पूर्ण फाईल्स NIC कडे नसल्याचे स्पष्टीकरण विभागाकडून देण्यात आले आहे.या उत्तरानंतर एस.के. त्यागी, आरए धवन आणि डि.के. सागर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, एकाही मुख्य सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याला या अॅपबद्दल माहिती देता आली नाही.
आरोग्य सेतू अॅपच्या वापराबद्दल केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर आग्रह होत असताना अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे माहिती नसल्याचे सांगणे हे स्वीकारले जावू शकत नाही, असे RTI ने म्हटले आहे.
अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे. तर ट्रेन आणि विमान प्रवास करणाऱ्यांनाही हा अॅप वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.