Panvel School College Holiday: पनवेलमधील शाळा, महाविद्यालयांना 2 जुलै रोजी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांचा आदेश
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या मुसळधार पावसाच्या अंदाजानंतर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा पाऊल म्हणून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना २ जुलै २०२६ रोजी अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने १ जुलै ते ५ जुलै या कालावधीत मुंबई आणि उपनगरांसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, सखल भागांत पाणी साचण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे.
दिलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार , पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना उद्या, म्हणजेच २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेष चितळे यांच्या स्वाक्षरीने हे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले असून, सर्व संबंधित संस्थांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान खात्याचा अंदाज आणि सुट्टीचे कारण
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, १ जुलै ते ५ जुलै २०२६ या कालावधीत परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रायगडचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय यांच्या पत्राच्या संदर्भाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संस्थांना लागू असेल सुट्टी
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या खालील सर्व आस्थापनांना २ जुलै रोजी सुट्टी असेल:
सर्व सरकारी आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा
सर्व माध्यमांच्या (मराठी, इंग्रजी, इत्यादी) शाळा
अनुदानित व विनाअनुदानित शाळा
सर्व महाविद्यालये (Colleges) आणि आश्रमशाळा
आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसाच्या काळात सतर्क राहावे आणि आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.