Ayub's licence Suspended मुंबईतील 'आयुब्स'सह 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबई एफडीए ची कारवाई
अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध 'आयुब्स'सह चार खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईदरम्यान राज्यभरातून २.२४ कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षेचे नियम आणि स्वच्छतेच्या निकषांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील चार हॉटेल्स व खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील फोर्ट भागातील प्रसिद्ध लेट-नाईट ईटरी 'आयुब्स'चा समावेश आहे. अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या या विशेष तपासणी मोहिमेत २.२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद आणि निकृष्ट अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
'आयुब्स'मध्ये आढळल्या गंभीर त्रुटी
फोर्ट परिसरातील 'आयुब्स' या खाद्य आस्थापनाची तपासणी केली असता तेथे अन्न सुरक्षेशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. यामध्ये अंड्यांसारख्या संवेदनशील पदार्थांची अयोग्य तापमानात साठवणूक, शिजवलेले आणि कच्चे अन्न योग्य प्रकारे वेगळे न ठेवणे, अस्वच्छ परिसर, उघडी गटारे, साचलेले पाणी, माशांचा प्रादुर्भाव आणि कीटक नियंत्रणाच्या अपुऱ्या उपाययोजना या बाबींचा समावेश होता. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव आणि नोंदींची कमतरता आढळल्यामुळे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
परवाना निलंबित झालेल्या इतर आस्थापना
'आयुब्स' व्यतिरिक्त इतर तीन खाद्य आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, नागपूरच्या प्रतापनगर भागातील बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर आणि गिरीपेठ येथील स्टेप इन रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
राज्यभरात ३७ आस्थापनांची तपासणी
प्रशासनाने मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये एकूण ३७ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य केंद्रांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान त्रुटी आढळलेल्या ३१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात मुंबईतील १०, पुण्यातील १४, छत्रपती संभाजीनगरमधील ५ आणि नागपूरमधील २ आस्थापनांचा समावेश आहे.
कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त
या राज्यव्यापी कारवाईत एकूण ६०,७०९.८ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची एकूण किंमत सुमारे २,२४,६१,८८८ रुपये आहे. यामध्ये नागपूरमध्ये जप्त करण्यात आलेल्या २.२३ कोटी रुपयांच्या ५५,९९६ किलो भाजलेल्या सुपारीच्या साठ्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त पुण्यात परवान्याशिवाय चालणाऱ्या एका व्यवसायातून ७.२६ लाख रुपयांचे अन्नपदार्थ जप्त करण्यात आले, तर जळगावमध्ये भेसळीचा संशय असलेले सोयाबीन तेल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी ही तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अन्न सुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.