दिल्ली: डेटिंग अॅपवरील मैत्री जीवावर बेतली; दागिने, पैसे लुबाडून निवृत्त विंग कमांडरच्या पत्नीची हत्या

दिल्लीतील भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर विनोद जैन यांच्या पत्नी मीनू जैन यांच्या हत्येचे गूढ उलघडले आहे.

Meenu Jain (Photo Credits: Facebook)

दिल्लीतील भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर विनोद जैन (Capt.V K Jain) यांच्या पत्नी मीनू जैन (Meenu Jain) यांच्या हत्येचे गूढ उलघडले आहे. दिल्लीतील एअरफोर्स अँड नेवल अपार्टमेंटमधील (Air Force and Naval Apartment) राहत्या घरी मीनू जैन यांचा मृतदेह सापडला होता. तेव्हा मात्र तो नैसर्गिक मृत्यू असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. मात्र मीनू यांचे दोन फोन न सापडल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरु केला.

हत्येच्या दिवशी मीनू यांच्या फ्लॅटमध्ये असलेल्या व्यक्तीच्या कारची एन्ट्री पोलिसांना सोसायटी सजिस्टरमध्ये सापडली. सीसीटीव्ही फूटेजमध्येही सेम नंबरची गाडी दिसली. मात्र तपासादरम्यान हा कार नंबर खोटा असल्याचे उघडकीस आले. त्याचबरोबर 26 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजता गुरुग्राम जवळ मीनू यांचा एक मोबाईल बंद झाल्याचे तपासात उघड झाले. या सगळ्यावरुन द्वारका पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

26 एप्रिल रोजी मीनू जैन यांची सुनियोजित कट आखून हत्या करण्यात आली. डेटिंग अॅपद्वारे मैत्री झालेल्या दिनेश दीक्षित याने मीनू जैन यांची हत्या केली. 56 वर्षीय दिनेश दीक्षित हा 26 एप्रिलला दुपारी 2:20 वाजता मीनू यांच्या घराखाली आला. त्याने मीनू यांना फोन करुन खाली बोलावले. त्यानंतर पुन्हा रात्री पावणेनऊच्या सुमारास दोघे कारने बाहेर जाण्यास निघाले. रात्री परत आल्यानंतर त्याने मीनू यांना गुंगीचे औषध दिले आणि 50 लाखांचे दागिने आणि पैसे लुटले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास टॉवेल आणि उशीने तोंड दाबून त्याने मीनू यांची हत्या केली. दुसऱ्या दिवशी मीनू यांच्या वडील आणि भावाला त्या घरात मृतावस्थेत सापडल्या.

मीनू जैन यांच्या वडिलांची पोस्ट:

आरोपी दिनेश दीक्षित हा कर्जबाजारी असून तो डेटिंग अॅपद्वारे विवाहित महिलांशी संपर्क करत असे. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे त्याच्यावर आरोप आहेत.