Ashadhi Wari 2026: आळंदीत पूरस्थिती, इंद्रायणी नदीला महापूर, चारही पूल पाण्याखाली; वारकऱ्यांसाठी प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

मावळ आणि धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आळंदी येथील इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. शहरातील चारही प्रमुख पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने वारकरी आणि भाविकांना आळंदीत न येण्याचे आणि आहे त्याच ठिकाणी सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले आहे.

पुणे आणि मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आळंदीच्या दिशेने येणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नदीची पाणी पातळी कमालीची वाढल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही प्रमुख पूल सध्या पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भाविकांना सध्या आळंदी शहरात न येण्याचे नमूद केले आहे.

भाविकांना जेथे आहात, तेथेच थांबण्याचे आवाहन

राज्यातील विविध भागांतून भाविक आणि दिंड्या आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. मात्र, आळंदीमधील सद्यस्थिती पाहता प्रशासनाने अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सध्या ज्या ठिकाणी आहात, त्याच ठिकाणी थांबून घ्यावे. परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

चारही प्रमुख पूल वाहतुकीसाठी बंद

इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे आळंदी शहराला जोडणारे सर्व मार्ग प्रभावित झाले आहेत. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. घाट परिसर आणि नदीलगतचा भागही पाण्याखाली गेला असून, सुरक्षेसाठी या भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत आणि योग्य ती नाकेबंदी करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement