तुकाराम मुंढे यांच्या रडावर आता बॉलिवूड; शाहरुख खान, अजय देवगण,टायगर श्रॉफ यांना विमल इलायची जाहिरातीवरून FDA ची नोटीस
विमल इलायचीच्या जाहिरातीमुळे पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र एफडीएने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान (Shah Rukh Khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांना विमल इलायचीच्या जाहिरातीवरून (Vimal Elaichi advertisement) महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही जाहिरात राज्यात बंदी असलेल्या पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार करत असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. राज्यात तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाल्याच्या विक्री व प्रचारावर सुरू असलेल्या कारवाईचा हा भाग आहे. तिन्ही अभिनेत्यांनी 2024 साली विमल इलायचीच्या एका जाहिरातीत एकत्र काम केले होते. अजय देवगण यांना जुहू येथील निवासस्थानी, तर शाहरुख खान यांना वांद्रे येथील 'मन्नत' या निवासस्थानी नोटीस देण्यात आली. टायगर श्रॉफ यांना त्यांच्या टायगर श्रॉफ प्रोडक्शन्स एलएलपी या कंपनीमार्फत नोटीस पाठवण्यात आली.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी 11 ऑगस्ट रोजी नऊ पानी नोटीस जारी करत अभिनेत्यांना तातडीने या मोहिमेतून बाहेर पडण्याचे आणि संबंधित प्रचारसाहित्य त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
एफडीएचा नेमका आक्षेप काय
नोटीसीनुसार, ही जाहिरात प्रामुख्याने पान मसाल्याशी संबंधित असलेल्या विमल या ब्रँडचा प्रचार करताना दिसते, आणि या पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. मुंढे यांच्या मते, जाहिरातीत 'विमल इलायची' या नावाचा वापर विमल पान मसाला या ब्रँडशी संबंध निर्माण करतो आणि त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते.
एफडीएने अभिनेत्यांकडून त्यांच्या जाहिरातीतील सहभागाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांना जाहिरात करारांच्या संपूर्ण प्रती, प्रचार मोहिमेचा तपशील, मानधनाची माहिती आणि मोहिमेत सहभागी होण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतल्याचे दाखवणारी कागदपत्रे सादर करण्यासही सांगण्यात आले आहे.
कोणत्या कायद्याखाली कारवाई
या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 च्या कलम 24 चा आधार घेण्यात आला असून, हे कलम दिशाभूल करणाऱ्या अन्न जाहिरातींशी संबंधित आहे. दिशाभूल करणाऱ्या प्रचारासाठी 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, तसेच संबंधित व्यक्तींना पुढील तीन वर्षांसाठी कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यास बंदी घातली जाऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाल्यावर 2012 पासून बंदी असून, ही बंदी दरवर्षी नव्याने अधिसूचित केली जाते. 13 जुलै 2026 पासून पुढील एका वर्षासाठी ही बंदी पुन्हा लागू करण्यात आली आहे. यापूर्वीही शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यासह इतर अभिनेत्यांवर तंबाखूजन्य उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागला आहे.
विमल इलायचीची जाहिरात मोहीम यापूर्वीही नियामकांच्या रडारवर आली होती, मात्र त्यावेळी कारवाई अभिनेत्यांऐवजी कंपनीविरोधात करण्यात आली होती. 2018 मध्ये आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) विमल इलायचीचा प्रचार करणाऱ्या विष्णू पाऊच पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, आणि सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायद्या (कोटपा), 2003 अंतर्गत ही जाहिरात तंबाखू उत्पादनांच्या अप्रत्यक्ष प्रचाराच्या कक्षेत येते, असा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण नंतर दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले, जिथे जानेवारी 2024 मध्ये न्यायालयाने डीजीएचएसचे अपील फेटाळले होते. या मोहिमेवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये अभिनेते अक्षय कुमार यांनीही अशाच प्रकारच्या मोहिमेतील सहभागावरून टीका झाल्यानंतर माफी मागितली होती.
एफडीएच्या व्यापक कारवाईचा भाग
अलीकडील छाप्यांदरम्यान एफडीएने सुमारे 15.11 कोटी रुपये किमतीचे बंदी असलेले पदार्थ जप्त केले आहेत. मुंढे हे राज्यात गुटखा व इतर बंदी असलेल्या तंबाखूजन्य उत्पादनांच्या उत्पादन आणि विक्रीविरोधातील अंमलबजावणी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरोगेट जाहिरातींची तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे एफडीएने नमूद केले आहे. या नोटिशींवर तिन्ही अभिनेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.