Oracle Layoffs 2026: विक्रमी 22% महसूल वाढीनंतरही 30000 कर्मचाऱ्यांना नारळ; 30 वर्षांचा अनुभव असलेल्यांनाही फटका
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओरॅकलने जागतिक स्तरावर सुमारे 30000 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीचा महसूल 22 टक्क्यांनी वाढलेला असताना आणि कंपनी फायद्यात असतानाही हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला असून, यात 30 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
आयटी क्षेत्रातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या 'ओरॅकल' (Oracle) कंपनीने जागतिक स्तरावर मोठी नोकरकपात जाहीर केली आहे. एप्रिल २०२६ च्या सुरुवातीलाच कंपनीने सुमारे २०,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे, कंपनीने नुकताच आपल्या महसुलात २२ टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदवली असताना ही कपात करण्यात आली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसला असून, देशातील सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्याचे वृत्त आहे.
30 वर्षांचा अनुभवही ठरला अपुरा
या नोकरकपातीचे सर्वात धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ नवीन कर्मचारीच नव्हे, तर ३० वर्षांहून अधिक काळ कंपनीत सेवा देणाऱ्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ओरॅकलमध्ये ३३ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या नीना लुईस या वरिष्ठ सुरक्षा तज्ज्ञासह अनेक अनुभवी अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे कामावरून कमी केल्याची माहिती मिळाली आहे. "३० वर्षांचे संस्थात्मक ज्ञान केवळ एका स्प्रेडशीटमुळे संपुष्टात येत नाही," अशा शब्दांत तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
भारतात 12 हजार कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड
ओरॅकलच्या या जागतिक निर्णयाचा सर्वाधिक तडाखा भारतीय कर्मचाऱ्यांना बसला आहे. भारतातील एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे १८% ते २०% कपात करण्यात आली आहे. यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स, प्रोजेक्ट मॅनेजर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पहाटे ५ ते ६ च्या सुमारास ईमेल पाठवून कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरून कमी करण्यात आले, ज्यामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नफा असतानाही कपात का?
ओरॅकल आर्थिक अडचणीत नसून कंपनीच्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआय (AI) व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. असे असूनही ही कपात करण्यामागे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) आणि ऑटोमेशनवर वाढलेला भर असल्याचे सांगितले जाते. कंपनी आता मनुष्यबळाऐवजी एआय डेटा सेंटर्स उभारण्यावर आणि ऑटोमेशनमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवत आहे. एआय साधनांमुळे कमी कर्मचाऱ्यांत जास्त काम करणे शक्य झाल्याने हा निर्णय घेतल्याचे समजते.
कर्मचाऱ्यांसाठी भरपाई आणि भविष्यातील आव्हाने
बाधित कर्मचाऱ्यांना कंपनीकडून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना १५ दिवसांचा पगार बोनस, एक महिन्याचा नोटीस पे, ग्रॅच्युइटी आणि सुट्ट्यांचे पैसे दिले जाणार आहेत. मात्र, एकाच वेळी हजारो वरिष्ठ अनुभवी लोक बाजारात आल्याने त्यांना नवीन रोजगार शोधणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.