IPL Auction 2025 Live

Pakistan Horror: क्षणार्धात कुटुंब उध्वस्त झाले! आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तीने पत्नी आणि 7 मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या

यामुळे गेल्या काही काळापासून तो मानसिक तणावाखाली होता. आता सततच्या आर्थिक त्रासाला कंटाळून त्याने आपले संपूर्ण कुटुंबच संपवले आहे.

गरिबी (Photo Credit : Pixaby)

Pakistan Man Kills Wife and 7 Children: पाकिस्तानामधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे, येथे आर्थिक संकटात सापडलेल्या एका व्यक्तीने आपल्या 7 मुलांवर आणि पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली आहे. या घटनेत सर्व 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. सज्जाद खोखर असे या व्यक्तीचे नाव असून, तो आपली मुले व पत्नीचे पालनपोषण करू शकत नव्हता, म्हणून त्याने त्यांची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ही घटना पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात घडली आहे.

पैशांअभावी आरोपी सज्जाद खूप अस्वस्थ होता आणि यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा वाद होत होते. यामुळे गेल्या काही काळापासून तो मानसिक तणावाखाली होता. आता सततच्या आर्थिक त्रासाला कंटाळून त्याने आपले संपूर्ण कुटुंबच संपवले आहे. या घटनेत सज्जादची 42 वर्षीय पत्नी कौसर, चार मुली आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. या गुन्ह्यानंतर पंजाब पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीने कुऱ्हाडीने आपल्या कुटुंबाची हत्या केली असून, आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो आपल्या मुलांना आणि पत्नीला खाऊ घालू शकत नव्हता, त्यामुळे त्याने त्यांचा खून केला. या घटनेने पाकिस्तानसह संपूर्ण जग हादरले आहे. याचाच अर्थ पाकिस्तानातील परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर गेली आहे की सर्वसामान्य लोक पैशाअभावी आपले कुटुंब उद्ध्वस्त करण्याकडे झुकत आहेत.

गरिबीने ग्रासलेल्या पाकिस्तानमध्ये याआधीही असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. माहितीनुसार, 2019 मध्ये असे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी मोहम्मद अजमल नावाच्या व्यक्तीने त्याची पत्नी आणि दोन मुलांसह सासू आणि पत्नीच्या तीन बहिणींची हत्या केली होती. मानवाधिकार गटांच्या मते, आर्थिक विवंचनेतून पाकिस्तानमध्ये दरवर्षी शेकडो महिला आणि मुलांची त्यांच्या कुटुंबियांकडून हत्या केली जाते. (हेही वाचा: Beggars On The Karachi Streets: रमजानच्या पार्श्वभूमीवर कराचीच्या रस्त्यांवर चार लाखांहून अधिक भिकारी जमले; शहरातील गुन्ह्यांमध्ये वाढ)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अदियाला तुरुंगातून सरकारला एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली आहे. आर्थिक स्थैर्याशिवाय कोणताही देश चालू शकत नाही, असे इम्रान म्हणाले. पाकिस्तानातील अलीकडच्या राजकीय घडामोडी आणि 1971 ची ढाका शोकांतिका यांची त्यांनी तुलना केली आहे. पाकिस्तानमध्ये 'ढाका ट्रॅजेडी' होण्याची भीती इम्रान यांनी व्यक्त केली आहे.