परवेझ मुशर्रफ (photo credit- twitter)

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या तणावाने परिसीमा गाठली. 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाल्यानंतर, या हल्ल्यात ‘जैश-ए-मोहम्मद’चा (Jaish-e-Mohammed) हात असल्याने भारताने एअर स्ट्राईक करून बालाकोट येथील  दहशतवादी तळ नष्ट केले. दरम्यान पाकिस्तान दहशतवादाला थारा देतो यामुळे भारतासह इतर राष्ट्रांनी पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली. मात्र पाकिस्तानने हा आरोप अमान्य केला. आता पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ (Former Pakistan President Pervez Musharraf) यांनी, त्यांच्या काळात भारतावर आतंकवादी हल्ले करण्यासाठी 'जैश' सारख्या दहशतवादी संघटनेचा वापर झाला असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.

बुधवारी, पाकिस्तानच्या ‘हम न्यूज’ या वृत्तवाहिनीसाठी पाकिस्तानचे पत्रकार नदीम मलिक यांना मुशर्रफ मुलाखत देत होते त्यावेळी त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. नुकतेच पाकिस्तानने 44 दहशतवाद्यांना अटक केली, या निर्णयाचे मुशर्रफ यांनी स्वागत केले. त्यानंतर तुमच्या काळात अशी कारवाई का घडली नाही नाही? असा प्रश्न विचारला असता, ‘यावर माझ्याकडे काही ठोस कारण नाही. त्यावेळी भारत-पाकचे संबंध अजून खराब होते, दोन्ही राष्ट्रे एकमेकांवर कुरघोडी करत होती. यासाठी जैशसारखी दहशतवादी संघटना आम्हाला मदत करत होती, त्यामुळे त्यांंच्यावर कारवाई केली नाही’ असे मुशर्रफ यांनी सांगितले आहे. (हेही वाचा: पुलवामानंतर लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट? तीन ठिकाणांहून स्फोटके जप्त, तपास सुरु)

मुशर्रफ यांच्यावर झालेला हल्ला देखील ‘जैश’नेच घडवला होता अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान आमच्या देशात दहशतवादी नाहीत असे सांगणारा पाकिस्तान आता तोंडघशी पडला आहे. तसेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीच जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आपल्या देशात असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानवरचा दबाव वाढल्याने पाकिस्तानने 44 दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे, यात मसूदच्या भावाचादेखील समावेश आहे.