Kuwait Building Fire: कुवेतमधील मंगफ परिसरात भीषण आग; अनेक भारतीयांसह 48 लोकांचा मृत्यू, 30 हून अधिक गंभीर जखमी (Watch Video)
Kuwait Building Fire

Kuwait Building Fire: कुवेतच्या (Kuwait) मंगफ (Mangaf) परिसरात बुधवारी एका रहिवाशी इमारतीला भीषण आग (Fire) लागली. या अपघातात आतापर्यंत जवळजवळ 48 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये मुख्यत्वे भारतीयांचा समावेश आहे. या अपघातामध्ये 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीपासून वाचण्यासाठी अनेकांनी इमारतीवरून उड्या मारण्यास सुरुवात केली व यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. अनेक जण भाजल्याने तर अनेकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुवेतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नरेटच्या मंगफ भागात असलेल्या सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात बुधवारी पहाटे आग लागली. हळूहळू ही आग पसरत गेली व काही क्षणातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या इमारतीमध्ये जास्त प्रमाणात भारतीय लोक वास्तव्याला होते.

पहा पोस्ट-

कुवेतच्या एकूण लोकसंख्येच्या 21% (10 लाख) भारतीय आहेत व यातील 30% (सुमारे 9 लाख) कामगार आहेत. ‘कुवैत टाईम्स'च्या बातमीनुसार, या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते, जे एकाच कंपनीचे कर्मचारी आहेत. भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता) हा अपघात झाला. वृत्तानुसार, तळमजल्यावरील स्वयंपाकघरात लागलेली आग वेगाने 6 मजली इमारतीत पसरली. अशा स्थितीत लोक आतमध्ये अडकले.

पहा व्हिडिओ-

ही इमारत घर कामगारांसाठी वापरली जात होती आणि तेथे मोठ्या संख्येने कामगार होते. तसेच या इमारतीत बहुतांश स्थलांतरित मजूर आणि अनेक लोक बेकायदेशीरपणे राहत असल्याचेही सांगितले जात आहे. या अपघातानंतर भारतीय राजदूत आदर्श स्विका घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींची भेट घेतली व भारतीय दूतावासाकडून मदतीचे आश्वासन दिले. कुवेतमधील भारतीय दूतावासाने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. आग आटोक्यात आणली गेली असून, त्याच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. (हेही वाचा: Girl Dies After Eating Pizza: काय सांगता? पिझ्झा खाल्ल्याने 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; जाणून घ्या काय घडले)

या भीषण अपघातासाठी कुवेत सरकारने इमारत मालकाला जबाबदार धरले आहे. कारण तिथे योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे आग काही वेळातच पसरली. त्यामुळे संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. कुवेतचे गृहमंत्री शेख फहद अल-युसेफ अल-सबाह यांनी पोलिसांना, इमारतीचा मालक, इमारतीचा चौकीदार आणि कामगारांसाठी जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.