Joe Biden

Diwali Celebration at White House: कालच्या वसुबारसने दिवाळी सणाला सुरुवात झाली. आज धनत्रयोदशी साजरी होत आहे. हिंदू लोकांचा सर्वात मोठा सण दिवाळी जगातील अनेक देशांमध्ये उत्सहात साजरा केला जातो. सध्या अमेरिकेतही दिवाळीची धामधूम सुरु आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी साजरी होत आहे. यंदाही राष्ट्रपती निवडणुका आणि भारतीय समुदायाला डोळ्यासमोर ठेवून सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लोकांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या कार्यक्रमात 600 हून अधिक भारतीय-अमेरिकन सहभागी झाले होते. जो बिडेन यांनी व्हाईट हाऊसच्या ब्लू रूममध्ये औपचारिक दिवा प्रज्वलित केला. यावेळी त्यांनी अमेरिकन लोकशाहीत योगदान दिल्याबद्दल दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाचे आभार मानले. भारतीय-अमेरिकन खासदार, अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना, जो बिडेन म्हणाले, ‘दक्षिण आशियाई अमेरिकन समुदायाने अमेरिकन जीवनाचा प्रत्येक भाग समृद्ध केला आहे. हा समुदाय जगातील सर्वात वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक जोडलेला समुदाय आहे. म्हणूनच आता व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी अभिमानाने साजरी केली जाते.’

व्हाईट हाऊसमध्ये साजरी झाली दिवाळी-

ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्राध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सिनेटर या आपल्या कार्यकाळात आपण मोठ्या संख्येने भारतीय-अमेरिकन लोकांसोबत काम केले आहे. आता व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित करणे हा आपल्यासाठी सन्मान आहे.’ मात्र, यावेळी उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन या दिवाळी कार्यक्रम सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत. बिडेन म्हणाले की, जिल आणि कमला यांना येथे यायचे होते, पण त्या प्रचारात व्यस्त आहेत. (हेही वाचा: Diwali 2024 Rangoli Designs: दिवाळीसणानिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ)

यावेळी सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून व्हिडिओ संदेशाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या या वर्षी त्यांना पृथ्वीपासून 400 किमीवर अंतराळ स्थानकावर दिवाळी साजरी करण्याची अनोखी संधी मिळाली आहे. दरम्यान, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या कार्यकाळात व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. मात्र ते कधीही वैयक्तिकरित्या या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. त्यानंतर 2009 मध्ये बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर व्हाईट हाऊसच्या दिवाळी कार्यक्रमात ते सहभागी होऊ लागले व ही परंपरा पुढे कायम राहिली.