Brave Afghan Girl: अफगाणी मुलीने AK-47 रायफलने केला तालीबानी दहशतवाद्यांचा खात्मा, घेतला आई-वडिलांच्या हत्येचा बदला; सरकारनेही केले शौर्याचे कौतुक
अफगाणीस्तान येथे तालिबानी अतिरेक्यांनी या अफगाणी मुलीच्या (Afghan Girl) आई-वडिलांना घराबाहेर ओढून त्यांना ठार मारले होते. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी या 16 वर्षांच्या मुलीने अतिरेक्यांवर गोळ्या झाडल्या.
मलाला यूसुफजईनंतर आणखी एका किशोरवयीन मुलीने तालिबानी अतिरेक्यांविरूद्ध (Taliban Terrorists) शौर्याचे एक उदाहरण उभे केले आहे. अफगाणीस्तान येथे तालिबानी अतिरेक्यांनी या अफगाणी मुलीच्या (Afghan Girl) आई-वडिलांना घराबाहेर ओढून त्यांना ठार मारले होते. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी या 16 वर्षांच्या मुलीने अतिरेक्यांवर गोळ्या झाडल्या. इतकेच नाही तर तिने इतर काही अतिरेक्यांनाही जखमी केले. या मुलीचे पालक सरकारचे समर्थक होते. या कारणास्तव, काही तालिबान दहशतवाद्यांनी त्यांना त्यांच्या घरात घुसून मारले होते. स्थानिक पोलिसांनी सोमवारी वृत्तसंस्था एएफपीला ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात मागील आठवड्यात तालिबानी अतिरेक्यांनी कमर गुल नावाच्या मुलीच्या घरात घुसल्याची घटना घडली. स्थानिक पोलिस प्रमुख हबीबुर्रहमान मलेकजादा यांनी सांगितले की, दहशतवादी या मुलीच्या वडिलांचा शोध घेत होते, जे गावचे प्रमुख आणि सरकारचे समर्थक होते. दहशतवाद्यांनी तिच्या वडिलांना घरातून जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या पत्नीने त्याला विरोध दर्शविला. त्यानंतर तालिबानी अतिरेक्यांनी घराबाहेर पती-पत्नीची हत्या केली.
या गोष्टीचा बदला घेण्यासाठी कमर गुलने घरातील एके-47 रायफल उचलली आणि आई-वडिलांचा खून करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. यानंतर तिने इतर काही अतिरेक्यांनाही जखमी केले. कमर गुलचे वय 14 ते 16 वर्षादरम्यान आहे. प्रांतीय राज्यपालांचे प्रवक्ते मोहम्मद अरीफ अबार यांनी सांगितले की, घडलेल्या घटनेनंतर अफगाण सुरक्षा दलांनी गुल आणि तिचा धाकटा भाऊ यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. (हेही वाचा: कुलभूषण जाधव प्रकरणात तिसरा Consular Access देण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला ऑफर)
या घटनेनंतर सोशल मीडियावरील लोकांनी गुलचे खूप कौतुक केले करून, तिला हिरो बनविले आहे. गेल्या काही दिवसांत गुलचा हेडस्कार्फ घातलेला आणि हातात मशीन गन घेतलेला एक फोटो व्हायरल झाला आहे. दरम्यान, घोर हा अफगाणिस्तानातील अविकसीत अशा प्रांतापैकी एक आहे. इथले महिलांवरील हिंसाचाराचे प्रमाण खूपच जास्त आहे. आता अफगाण सरकारने कमर गुलच्या शौर्याचे कौतुक केले आहे आणि राष्ट्रपती अशरफ गनी (Ashraf Ghani) यांनी तिला राष्ट्रपती राजवाड्यात आमंत्रित केले आहे.