Made by Tata iPhones: लवकरच बाजारात येणार टाटा कंपनीचे आयफोन; ठरणार असा पहिला भारतीय ब्रँड, Wistron कंपनीशी करार अंतिम टप्प्यात
Ratan Tata (Photo Credits: Getty Images)

देशातील एक मोठे औद्योगिक घराणे असलेल्या टाटा (Tata) समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. आता लवकरच कंपनी आयफोन (iPhone) बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. अॅपलचा पुरवठादार विस्ट्रॉन कॉर्पशी टाटाची बोलणी सुरू असून ऑगस्टपर्यंत दोन्ही कंपन्यांमध्ये करार होऊ शकतो, असे मानले जात आहे. हा करार पुढे गेल्यास टाटा समूह आयफोन असेंबल करणारी पहिली भारतीय कंपनी असेल. विस्ट्रॉनचा प्लांट कर्नाटकात आहे. करार झाल्यानंतर टाटा कर्नाटकातील प्लांट ताब्यात घेऊ शकते.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हे मूल्य $600 दशलक्षपेक्षा जास्त असू शकते. यात आयफोन 14 मॉडेल असेंबल करणे समाविष्ट आहे. या ठिकाणी 10,000 पेक्षा जास्त कामगार काम करतात.

तैवानची कंपनी विस्ट्रॉन ही करारावर इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करते. विस्ट्रॉनने या आर्थिक वर्षात या कारखान्यातून किमान $1.8 अब्ज किमतीचे आयफोन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जेणेकरून त्याला सरकारी प्रोत्साहन मिळू शकेल. कंपनीने पुढील वर्षापर्यंत तिप्पट कर्मचाऱ्यांच्या भरतीचे उद्दिष्ट ठेवले आहे. विस्ट्रॉनला भारतातील आयफोन व्यवसायातून बाहेर पडायचे आहे आणि टाटाने ते खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.

याबाबत टाटा, विस्ट्रॉन आणि ऍपलच्या प्रवक्त्यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला आहे, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने अॅपलच्या कामकाजातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांचे लक्ष इतर व्यवसायांवर असेल. कंपनी भारतात ऍपल व्यतिरिक्त इतर उत्पादनांमध्ये आपली क्षमता तपासणार आहे. सरकार कंपन्यांना उत्पादन आणि रोजगार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. (हेही वाचा; Foxconn: वेदांताशी विभक्त झाल्यावर फॉक्सकॉन कंपनी भारतात चीप बनवण्यासाठी अर्ज करणार)

दरम्यान, कोरोना महामारीमुळे पुरवठा समस्या आणि अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आहेत. अशा स्थितीत भारत हा गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश म्हणून पुढे आला आहे. टाटा समूहाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात प्रवेश केला आहे. तामिळनाडूतील कंपनीची फॅक्टरी आयफोनची चेसिस म्हणजेच डिव्हाइसचा मेटल बॅकबोन बनवते. यासोबतच कंपनीने चिप्स बनवण्यातही रस दाखवला आहे.