TikTok ला टक्कर देणारे Mitron App प्ले स्टोअर वरून हटवले; गुगल ने मित्रों अ‍ॅपवर लावला नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप
Mitron app (Photo Credits: Play Store)

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर टिकटॉक (TikTok) विरुद्ध युट्युब (Youtube) हा वाद सुरु आहे. त्यात चीन आणि कोरोना व्हायरसच्या कनेक्शनमुळे देशात सध्या टिकटॉक बॅन (TikTok Ban) करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत शॉर्ट व्हिडिओ मेकिंग मित्रों अ‍ॅप (Mitron App) रातोरात लोकप्रिय ठरले होते. मात्र आता टिकटॉकला उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आलेले हे भारतीय मित्रों अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून काढून टाकण्यात आले आहे. आतापर्यंत 50 लाख पेक्षा जास्त युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले होते.

अहवालानुसार, स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसीचे (Minimum Functionality’ Policy) उल्लंघन केल्याबद्दल गुगलने Google Play Store वरून हे काढले आहे. गूगलच्या या धोरणात असे म्हटले आहे की, दुसऱ्यांच्या अ‍ॅपच्या कॉन्टेंटमध्ये काहीही बदल न करता किंवा त्यात थोडेफार अपडेट्स घालून अपलोड करणे, हे धोरणांच्या विरोधात आहे. एकूणच गूगलचे हे धोरण म्हणते की, कॉपी पेस्ट अ‍ॅप - म्हणजेच इतर अॅप्सशी पूर्णपणे मिळते-जुळते अ‍ॅप्स आणि त्यांच्या कोडमध्ये कोणताही बदल न झाल्यास, कंपनी ते काढून टाकते. पण आता प्रश्न असा आहे की, हे अ‍ॅप बर्‍याच दिवसांपासून गुगल प्ले स्टोअरवर आहे, मग कंपनीने आधीच हे का काढून टाकले नाही?

यासह, या अ‍ॅप साठी लागणारा सोर्सकोड हा भारतीय डेव्हलेपर्सने अवघ्या 2600 रुपयात विकत घेण्यात आला असल्याचा दावा पाकिस्तानी सॉफ्टवेअर कंपनीने केला आहे. या अ‍ॅपचे सर्व फिचर्स, इंटरफेस आणि सर्व काही टिक टिक या पाकिस्तानी सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनी असणाऱ्या क्यूबॉक्सअसचे (Qboxus) आहेत, यातच किंचित बदल करून मित्रो हा अ‍ॅप तयार करण्यात आल्याचा या कंपनीचा दावा आहे. (हेही वाचा: Tik Tok ला टक्कर देण्यासाठी आलं Mitron App; आतापर्यंत 50 लाख पेक्षा जास्त लोकांनी केलं डाऊनलोड)

दरम्यान, मित्रोंची रचना आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्याने केली असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र त्यातही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. एका महिन्यातच, हे अ‍ॅप 5 दशलक्षांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले होते.