राही सरनोबत (Photo Credit: twitter)

नुकतीच अर्जुन पुरस्कारां\ची घोषणा झाली. कोल्हापूरची नेमबाज सुवर्णकन्या राही जीवन सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट असून, या बातमीमुळे राहीवर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राहीचे वडील जीवन सरनोबत यांनीही या बद्दल त्यांचा आनंद व्यक्त करून केंद्र सरकारने तिच्या कामगिरीचा योग्य गौरव केल्याचे सांगितले आहे.

कोल्हापूर येथून राहीने तिच्या नेमबाजीच्या कारकिर्दीला सुरुवात केली, तिथूनच तिने नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षणही घेतले. 2008 साली झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत राहीने पहिले सुवर्ण पदक मिळविले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. इथूनच तिच्या कारकीर्दीने भरारी घेतली. नुकतेच जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नेमबाजांकडून पदकांची लटलूट झाली. यात नेमबाजीमध्ये राही सरनोबत हिने 25 मीटर पिस्तुल प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. राहीचा हा 'सुवर्ण'वेध ऐतिहासिक ठरला, कारण आशियाई स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

2011 साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत राहीने कांस्यपदक मिळवले होते, तर 2012 साली लंडन ऑलिंपिकसाठी तिची निवड झाली होती. ग्लासगो येथे 2014 साली झालेल्या राष्ट्रकुल खेळात तिने पुन्हा सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याच वर्षी इंचीऑन येथील कांस्यपदकही तिने जिंकले. चँगवॉन येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा तिने जिंकली होती. मात्र 2014 ते 2018 या कालावधीमध्ये राहीला एकही पदक जिंकता आले नव्हते. त्यामुळे तिच्याबर बरीच टीकादेखील झाली होती. मात्र येणाऱ्या नैराश्येतून मार्ग काढत राहीने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये, 25 मीटर पिस्तुल प्रकारात 34 गुण मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. तिने थायलंडच्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकून हा सुवर्णवेध साधला होता. या यशातून राहीने परत एकदा स्वतःला सिद्ध केले होते. कोल्हापूरकरांनी तर राहीची जंगी मिरवणूक काढून हे यश साजरे केले होते. आता राहीला सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने आज पुन्हा एकदा करवीरनगरीत आनंदाची लाट पसरली आहे.