स्मृती खेळांच्या: दुर्मिळ होत चाललेला 'विटी-दांडू'
विटी-दांडू खेळाचा आनंद लुटताना बालसवंगडी

कोलू का... कोलू का..?

ये थांबंय...थांब! नगं कोलूस... !

हे बघ कोलतू....

हां... कोल....!

कोलली बघ......!

आपल्यापैकी अनेकांनी हा संवाद लहानपणी ऐकला असेल. नव्हे... नव्हे केलाही असेल. भाषा आणि ठिकाण यांच्यातील थोड्याफार फरकानं हा संवाद बदलला असेल इतकेच. पण, त्यातली मजा तिच. हा संवाद आहे विटी-दांडू खेळातला. साधारण पावसाळा संपला किंवा संपत आला की हा खेळ सुरू होणार म्हणजे होणार. खरं म्हणजे या खेळाला विशिष्ट असा काळ नसायचा. पण, लहानपणी खेळले जाणारे अनेक खेळ हंगामी असत. जसे की, विटी-दांडू, कोयऱ्या, गोट्या, भोवरा, पतंग उडवणे आदी. यातलाच एक खेळ म्हणजे विटी दांडू....

काळाच्या ओघात अस्सल देशी खेळ झाकोळले

आज वयाच्या पंचविशी किंवा तिशी पार केलेल्या केणत्याही व्यक्तिला विचारा. त्यांच्यापैकी बहुतेकांनी हा खेळ खेळला असेल. विटी-दांडू खेळण्यातली मजा काही औरच. काळाच्या ओघात सर्वच परंपरांवर मर्यादा आल्यामुळे त्या झाकोळून गेल्या आहेत. भारतीय खेळही त्याला अपवाद नाहीत. आजकालचे बैठे खेळ आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचे गेम यांनी मोठी जागा व्यापली. त्यामुळे अस्सल देशी खेळ बरेच झाकोळले आहेत. विटी-दांडूही त्याला अपवाद नाही. त्यामुळेच तर शरहातून केव्हाच बाद झालेला हा खेळ ग्रामीण भागातूनही हद्दपार झाला आहे. किंवा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. अर्थात, तसे या खेळाला शहरात फारसे स्थान कधीच नव्हते.

शून्य रुपयांती भरपूर आनंद देणारा खेळ

विटी दांडू हा अस्सल महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. या खेळाची मूळं अगदी शिवाजी महाराजांच्या किंवा त्याच्याही आगोदरच्या काळापर्यंत जातात. खेडोपाडी आणि प्रत्येक वाड्यावस्त्यांवर, पाड्यापाड्यांवर खेळला जाणारा हा खेळ खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आहे. हा खेळ खेळण्यासाठी शून्य रूपये खर्च येतो. तसेच, दोन व्यक्ती (खेळाडू)ते असंख्य लोक या खेळात सहभागी होऊ शकतात. झाडाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेला एक दांडू आणि त्याच लाकडापासून तयार केलेली विटी असली की या खेळाचे काम भागते. याला म्हटले तर, मैदान नाहीतर हा खेळ कुठेही रिकाम्या जागेत खेळता येतो.

खेळाची साधनं

दांडू - लाकडाचा एक निमूळता पण, पायाच्या आंगठ्याच्या जाडीइतका तुकडा (साधारण एक ते दीड फूट लांबीचा) घेऊन त्याला एका बाजून धार काढली की दांडू तयार. कोणत्याही दांडूचा आकार हा पाव्या (बासरी) सारखा भासतो.

विटी - साधारण एक वित किंवा त्याहून कमी लांबीच्या लाकडाचा निमूळता पण, पायाच्या आंगठ्याच्या जाडीइतका तुकडा असलाकी विटीचे काम भागते. या निमूळत्या लाकडाला दोन्ही बाजूंनी टोक काढले जाते. कोणतीही विटी ही दोन्ही बाजूंनी टोक काढलेल्या शिसपेन्सीलसारखी दिसते.

खेळाचे स्वरूप :

हा खेळ खेळण्यासाठी दोन संघ असावे लागतात. हे संघ एका एका खेळाडूचेही बनतात तसेच, समान संख्येच्या असंख्य खेळाडूंचेही असू शकतात. जमीनीवर एक छोटा खड्डा खणून त्यावर विटी ठेवतात. या खड्ड्याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत. जसे की, गद, गली, गल वैगेरे. या खड्ड्यावर विटी ठेऊन दांडूच्या धार असलेल्या भागाने ती कोलवली जाते. ही कृती एका संघातील एक खेळाडू करतो. पहिल्यांदा कोणत्या संघाने विटी कोलायची यासाठी टॉस केला जातो. पूर्वीच्या काळी हा टॉस खापराच्या किंवा चपटी दगडाला थूंकी लाऊनही केला जात असे. थुंकी असलेला व नसलेला भाग छापा, काटा म्हणून ओळखला जाई. दरम्यान, ही विटी कोलल्यावर विशिष्ट अंतरावर उभे असलेले विरूद्ध संघातील लोक ती झेलत असतात. झेल पकडल्यास विटी कोलणारा खेळाडू बाद होतो. झेल सुटल्यास ती विटी दांडूने उडवून टोलवली जाते. जोपर्यंत हा टोला चुकत नाही किंवा टोलवलेल्या विटीचा झेल पकडला जात नाही तोपर्यंत तो खेळाडू बाद होत नाही.

दरम्यान, टोलवाटोलवी करत हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने पार केलेल्या अंतराच्या प्रमाणात अंक मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर हवेतल्या हवेत दोनवेळा विटीला उडवलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच ज्याचं कौशल्य जास्त असेल त्याचे गुण जास्त होतात.

खेळण्यासाठी अत्यंत मनोरंजक असलेला हा खेळ सध्या दुर्मिळ होत चालला आहे.