IND vs SL 3rd T20I: श्रीलंकाविरुद्ध पुणे टी-20 सामन्यात बनू शकतात 'हे' रेकॉर्डस्, विराट कोहली 'या' मोठ्या विक्रमांच्या उंबरठ्यावर, वाचा सविस्तर
विराट कोहली (Photo Credits: IANS)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) उद्या, 10 जानेवारीला 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळणार आहे. पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल. गुवाहाटीमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर इंदोरमधील सामन्यात 7 विकेटने विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पुण्यातील सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरतील, तर श्रीलंका संघ सामना जिंकत मालिका ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात असेल. दुसर्‍या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद करण्यात आली. आणि आता पुण्यातही दोन्ही संघांचे खेळाडू मोठे विक्रम नोंदवू शकतात. (विराट कोहली याने श्रीलंकाविरुद्ध 'नटराज' स्टाईलमध्ये विजयी सिक्स मारल्यावर रिषभ पंत याला पाहून केले Wink, पाहा Video)

जसप्रीत बुमराह, भारतीय कर्णधार कोहलीपासून श्रीलंकाई कर्णधार लसिथ मलिंगा या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात काही महत्तवपूर्ण विक्रमांची नोंद करू शकतात. जाणून घ्या इथे:

1. जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 52-52 विकेट्स घेतल्या आहेत. हे तीन गोलंदाज भारतासाठी सर्वाधिक टी-20 विकेट घेणारे गोलंदाज आहेत. मात्र, या सामन्यात बुमराह आणि चहलला पुढे जाण्याची संधी असेल.

2. जर शार्दुल ठाकूर याने पुणे सामन्यात 6 विकेट घेतले तर टी-20 क्रिकेटमधील त्याचे 100 विकेट पूर्ण होतील.

3. श्रीलंकाविरुद्ध तिसऱ्या सामन्यात 2 चौकार ठोकताच विराट टी-20 क्रिकेटमध्ये 800 चौकार पूर्ण करेल. असे करणारा तो भारताचा दुसरा फलंदाज होईल. यापूर्वी शिखर धवन, आरोन फिंच, डेविड वॉर्नर, ब्रेंडन मॅक्युलम आणि क्रिस गेल यांनी 800 पेक्षा अधिक चौकार लगावले आहेत.

4. श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ गोलंदाज मानला जातो. शिवाय आंतराष्ट्रीय क्रिकेटमधेही तो त्याच्या यॉर्कर गोलंदाजीसाठी प्रख्यात आहे. मलिंगाने आजवर 545 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात जर त्याने 5 विकेट घेतले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 550 विकेट्स पूर्ण करेल.

5. विराटने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये आजवर 73 षटकार लगावले आहे. या सामन्यात एक सिक्स मारत तो माजी सिक्सर किंग युवराज सिंह याची बरोबरी करेल, तर दोन किंवा अधिक षटकार मारत त्याला मागे टाकेल. युवराजच्या नावावर 74 षटकार आहेत.

6. आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये खेळलेल्या 71 डावांमध्ये कोहलीने 248 चौकार ठोकले आहेत. पुण्यात दोन चौकार ठोकतआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 250 चौकार ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज होईल. विराटच्या मागे 234 चौकारांसह रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर, तर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 233 चौकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

7. भारतीय कर्णधार कोहलीने मागील सामन्यात कर्णधार म्हणून 1,000 टी-20 धावा पूर्ण केल्या आणि आता तिसऱ्या सामन्यात त्याला फक्त एक धाव करण्याची गरज आहे कर्णधार म्हणून 11,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी. विराटने इंदोर सामन्यात नाबाद 30 धावा केल्या आणि आता त्याची टी-20 धावसंख्या 10,999 आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दुसऱ्या सामन्यात टीमने सर्व विभागात प्रभावी कामगिरी केली होती आणि तिसऱ्या सामन्यातही संघ तोच फॉर्म कायम ठेवण्याच्या निर्धारित असेल. हा सामना जिंकून भारत वर्षातील पहिली मालिका खिशात घालेल.