'बीसीसीआय'ला झटका; 'आयसीसी'ने पाकिस्तानच्या बहिष्काराची मागणी धुडकावली
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बीसीसीआय (BCCI) ला चांगलाच झटका दिला आहे. आतंकवादाला पाठींबा देणाऱ्या देशांशी संबंध ठेऊ नये, अशा आशयाचे पत्र बीसीसीआयने आयसीसीला पाठवले होते. मात्र बीसीसीआयचा हा प्रस्ताव धुडकावून लावण्यात आला आहे. आयसीसीने हे स्पष्ट केले आहे की यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा निर्णय देऊ शकत नाहीत. पुलवामा हल्ल्यानंतर जेव्हा देशात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती, त्यावेळी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर ठेवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न होता.

शनिवारी, आयसीसी बोर्डाची एक बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष शशांक मनोहर होते, त्यावळी हा मुद्दा चर्चेत आला मात्र त्यावर जास्त चर्चा होऊ शकली नाही. यावेळी आयसीसी अध्यक्षांनी स्पष्ट केले की कोणत्याही देशावर बहिष्कार टाकणे हा निर्णय सरकारी पातळीवर घेतला जातो, आयसीसीमध्ये अशा प्रकारचा कोणताही नियम नाही. बीसीसीआयचे प्रतिनिधी कार्यकारी सचिव अमिताभ चौधरींनी देशाची बाजू मांडली. बीसीसीआयने आपल्या पत्रात पाकिस्तानचा उल्लेख करणे टाळले होते. (हेही वाचा: IPL 2019 चा उद्घाटन सोहळा रद्द; पुलवामा हल्ल्यातील शहीद कुटुंबांना दान करणार रक्कम- BCCI)

बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘आयसीसीचे सदस्य असलेल्या देशांमधील अनेक खेळाडू पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये खेळतात. त्यांनी कधीही अशा बहिष्काराची मागणी केली नाही.’ भारतीय क्रिकेट संघ 16 जून रोजी विश्वकरंड स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, हरभजनसिंग आणि सौरव गांगुलीसारख्या प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा आग्रह केला आहे. मात्र हा निर्णय भारत सरकार घेऊ शकते असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.