ICC Cricket World Cup 2019: पाकिस्तानवर बहिष्कार नको, पराभूत करुन बदला घ्या: सचिन तेंडूलकर
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty Images)

ICC Cricket World Cup 2019: पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या संतापातून आवाज उठत आहे की, ICC Cricket World Cup 2019 मध्ये भारताने पाकिस्तानवर (Pakistan) बहिष्कार टाकावा. पण, विश्वचषक स्पर्धेसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानवर खरोखरच बहिष्कार घालावा का? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सचिनला वाटते की विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर बहिष्कार घालू नये. असा बहिष्कार घातला तर, त्याचा पाकिस्तानलाच फायदा होऊ शकतो. त्याउलट पाकला पराभूत करुन भारताने बदला घ्यावा.

वृत्तसंस्था पीटीआसोबत बोलताना सचिनने सांगितले की, 'भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही आणि त्यामुळे जर पाकिस्तानला गुण वाढून मिळाणे चुकीचे वाटते. कारण असे केल्याने पाकिस्तानलाच फायदा होईल. आजवरचा इतिहास आहे की, वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नेहमीच पराभूत केले आहे. व्यक्तिगत पातळीवर विचाराल तर, पाकिस्तानवर बहिष्कार टाकून त्यांना दोन गुण वाढवून दिले तर मला ते तिरस्कारनीय वाटेल. पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यापेक्षा त्याला पराभूत करुन बदला घ्यायला हवा परंतू, असे असले तरी माझ्यासाठी देश महत्त्वाचा असेल. देश जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल',असेही सचिन तेंडूलर याने म्हटले आहे.

दरम्यान, हरभजन सिंह आणि युजवेंद्र चहल यांच्यासारख्या काही खेळाडूंनी पाकिस्तानवर वर्ल्डकप स्पर्धेत भारताने पूर्ण बहिष्कार टाकावा अशी मागणी केली आहे. (हेही वचाा, ICC World Cup 2019: तर भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार नाही)

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यानंतर बॉलिवुडसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. आता ICC Cricket World Cup 2019 मध्येही भारताने पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा अशी मागणी पुढे येत आहे.