Virender Sehwag Trolls CSK: सलग दोन सामने गमावणाऱ्या चेन्नईला वीरेंद्र सेहवागने लगावला टोला, म्हणाला- 'पुढच्या सामन्यात ग्लुकोज लावून यावे लागेल'
चेन्नईला वीरेंद्र सेहवागने लगावला टोला (Photo Credit: Facebook and Twitter)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) चेन्नईचा दारुण पराभव केला. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यापासूनच धोनी आणि टीमवर क्रिकेटविश्व आणि समीक्षकांकडून टीका केली जात आहे. भारतीय क्रिकेट टीमचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) चेन्नई सुपर किंग्जवर टीका करत फलदाजांना ग्लुकोज पिऊन मैदानात यावं लागेल असं ट्विट केलं. सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नई बॅटने संघर्ष करताना दिसली. फाफ डु प्लेसिस वगळता अन्य फलंदाज मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरले. शुक्रवारी, महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेला (CSK) दिल्लीने 44 धावांनी पराभूत करून स्पर्धेत दुसऱ्या प्रभावाचा धक्का दिला. दिल्लीने दिलेल्या 176 धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 131 धावांपर्यंतच मजल मारता आली. (CSK vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सचा CSKला डबल दणका, चेन्नईविरुद्ध 44 धावांनी मिळवला विजय; एमएस धोनीची पुन्हा संधी खेळी)

सेहवागने सीएसकेच्या फलंदाजीची खिल्ली उडवली आणि पुढच्या मॅचसाठी फलंदाजीसाठी ग्लुकोज पिऊन मैदानात यावं लागेल असं म्हटलं. याशिवाय सेहवागने 'वीरूची बैठाक' असा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि म्हटलं की, "‘दिल्ली मेट्रो’ने ‘चेन्नई एक्सप्रेस’चा धुव्वा उडवला. दिल्लीने डॅड आर्मी म्हणजे थालाच्या संघाची शिटी वाजवली. जर तुम्ही टी20 ऐवजी पर्थच्या पीचसारखं टेस्ट क्रिकेट खेळाल तर त्यापेक्षा मी सुरज बडजात्याचा चित्रपट का नाही पाहणार."

दरम्यान, दोन्ही सामन्यांत त्यांची फलंदाजी दिशाहीन दिसत होती कारण फलंदाजांनी विजय मिळवण्याचा मानस क्वचितच दाखवला होता. दोन्ही सामन्यात डावाच्या सुरुवातीपासूनच, ते एकूण धावांचा पाठलाग करण्याच्या विचारात असल्याचे दिसतच नव्हते. सीएसकेचे फलंदाज दिल्लीच्या फिरकीपटूंविरुद्ध सामन्यात संघर्ष करताना दिसले. अक्षर पटेल आणि अमित मिश्राच्या फिरकी जोडीने 8 ओव्हरमध्ये 41 धावा दिल्या. शिवाय, धोनी वरच्या स्थानावर फलंदाजीला आला असला तरी तो देखील सीएसकेचे भाग्य बदलू शकला नाही. राजस्थानविरुद्ध 217 धावांचा पाठलाग करताना सीएसकेने 200 धावा केल्या. शेवटच्या षटकात एमएस धोनीने तीन षटकार ठोकल्यानंतर सीएसके 200 धावांचा टप्पा गाठू शकली.