ICC Men's Rankings: विराट कोहलीची T20I क्रमवारीत चौथ्या स्थानावर बढती, Rohit Sharma याची वनडे क्रमवारीत घसरण, पहा संपूर्ण आयसीसी रँकिंग

टी-20 क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने चौथ्या स्थानी झेप घेतली तर फॉर्मशी संघर्ष करणारा केएल राहुल पाचव्या स्थानी घसरला आहे. आयसीसीच्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माची घसरण होऊन तो आता तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC Men's Rankings: आयसीसीने (ICC) बुधवारी एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमधील खेळाडूंची ताजी रँकिंग जाहीर केली. टी-20 क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने चौथ्या स्थानी झेप घेतली तर फॉर्मशी संघर्ष करणारा केएल राहुल (KL Rahul) पाचव्या स्थानी घसरला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्ध (England) पाच टी-20 सामन्यात कोहलीने 115.50 च्या सरासरीने 231 धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध सभ्य खेळी करणारा डेविड मलान (Dawid Malan) 892 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार आरोन फिंच 830 गुणांसह त्याच्या मागे आहे तर बाबर आझम 801 गुणांसह तिसर्‍या स्थानावर कायम आहेत. गोलंदाजी विभागात आदिल रशीदने (Aadil Rashid) 694 गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली, तर तबरेझ शम्सीने टी -20 आय फॉर्मेटमध्ये रशीद खानला ढकलत 'नंबर वन'चे सिंहासन मिळवले. तथापि, एकही भारतीय गोलंदाजाला टी-20 पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले नाही. (ICC Women's T20I Rankings: भारताची Shafali Verma ने पुन्हा मिळवला टी-20 नंबर एक फलंदाजाचा मान, ODI मालिका विजयाचा दक्षिण आफ्रिका संघाला फायदा)

दुसरीकडे, आयसीसीच्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माला (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध मालिकेत खराब कामगिरीचा फटका बसला आहे. ‘हिटमॅन’ची घसरण होऊन तो आता तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 837 गुणांसह दुसर्‍या स्थानावर झेप घेतली. तथापि, रोहित आणि बाबरमध्ये फक्त एक गुणाचा फरक आहे. भारताविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 66 चेंडूत 94 धावांची विध्वंसक खेळी करणारा जॉनी बेअरस्टोने चार स्थानाची झेप घेत एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या दहामध्ये प्रवेश केला. बेअरस्टो आता 7व्या स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये बेन स्टोक्सने तिसर्‍या स्थानावर झेप घेतली तर दुखापतीमुळे इंग्लंड मालिकेला मुकणार भारताचा रवींद्र जडेरा 9व्या स्थानावर घसरला आहे.

वनडे रँकिंग

टी-20 क्रमवारी

अन्य भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे तर पाचाव्या टी-20 सामन्यात रोहितच्या 34 चेंडूत 64 धावांनी त्याला 14वे स्थान मिळवून दिले. श्रेयस अय्यर कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट 26वे स्थान पटकावले, तर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांनीही क्रमवारीत प्रगती केली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 21व्या स्थानावरून 24व्या स्थानावर पोहचला आहे तर हार्दिक पांड्याने 47 स्थानाची उडी घेत 78वे स्थान पटकावले आहे.