T20 World Cup: भारतामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी BCCI ला 28 जूनपर्यंतची मुदत
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: IANS)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC), बीसीसीआयला (BCCI) भारतातील कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर टी-20 विश्वचषक स्पर्धेचे (T20 World Cup) आयोजन करण्याचा निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. आयसीसी बोर्डाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीमध्ये ही 28 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पूर्व नियोजित वेळेनुसार यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. बीसीसीआयने एक महिन्याचा कालावधी मागितला होता, जो आयसीसी बोर्डाने एकमताने दिला.

आयसीसी बोर्डाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, ‘हो, आयसीसी बोर्डाने बीसीसीआयची विनंती मान्य केली आहे आणि भारतात टी-20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. पुढील महिन्यात ते ठोस योजना घेऊन पुन्हा बोर्डाकडे येतील.’ एएनआयशी बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली

बीसीसीआय सूत्रांनी सांगितले की, 'भारतामधील कोविड-19 परिस्थितीमध्ये कशाप्रकारे सुधारणा होते हे पाहण्यासाठी बीसीसीआयला वेळ देण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला. पुढील महिन्यात परिस्थितीत सुधारणा झाल्यास स्पर्धेला कसे पुढे घेऊन जायचे याविषयी भारतीय बोर्ड निर्णय घेऊ शकेल. मात्र जर का परिस्थिती सुधारली नाही, तर आम्ही ही स्पर्धा युएईमध्ये घेण्याचा विचार करू शकतो, जे बॅक-अप स्थळ आहे.'

आयसीसी बोर्डाच्या सदस्याने सांगितले की, 'बीसीसीआयला भारतात जागतिक विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करायचे आहे. त्यांना ही संधी गमवायची नाही. आयसीसी बोर्ड आणखी दोन विंडो शोधत आहे. त्यातील एक फेब्रुवारी 2022 आहे परंतु त्याच वेळी महिला एकदिवसीय विश्वचषक होणार आहे.’

कोरोनाची परिस्थिती पाहता भारतात या स्पर्धा आयोजित करण्यासाठी सौरव गांगुली यांना सरकारची परवानगी घ्यावी लागेल. जर का ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीसीसीआय या स्पर्धा भारतात आयोजित करण्यात यशस्वी ठरले, तर त्या नऊ ऐवजी मुंबईतील तीन ठिकाणी आयोजित केल्या जाऊ शकतील.