SuryaKumar Yadav (Photo Credit - X)

Syed Mushtaq Ali Trophy 2024: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 3 डिसेंबर रोजी मुंबई विरुद्ध सर्व्हिसेस सामना खेळला गेला, ज्यामध्ये मुंबईने 39 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी अर्धशतकी खेळी खेळताना विरोधी गोलंदाजांची कोंडी केली. एकीकडे भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने 46 चेंडूत 70 धावांची खेळी केली, तर दुबेने अवघ्या 37 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली. दुबे आणि सूर्यकुमार यांच्यात 130 धावांची भागीदारीही झाली, ज्याचा मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा होता.  (हेही वाचा  -  World's Richest Cricketer Aryaman Birla: वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी आर्यमन बिर्लाची क्रिकेटमधून निवृत्त; विराट-धोनीपेक्षा श्रीमंत, 'इतक्या' कोटींचा मालक आहे तरी कोण?)

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सर्व्हिसेस सामना खेळला गेला, ज्यामध्ये मुंबईने प्रथम खेळताना स्कोअरबोर्डवर 192 धावा केल्या. 60 धावांपर्यंत मुंबई संघाने 3 विकेट गमावल्या होत्या. येथून दुबे आणि सूर्यकुमार यांनी मिळून अवघ्या 66 चेंडूत 130 धावा केल्या. दोघांनी मिळून एकूण 141 धावा केल्या. भारताच्या दोन्ही स्टार खेळाडूंनी मिळून 9 चौकार आणि 11 गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणेने 22, तर श्रेयस अय्यरने 20 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल सर्व्हिसेस संघ 153 धावांवर सर्वबाद झाला.

बहिणीच्या लग्नानंतर सूर्यकुमार परतला

एकीकडे शिवम दुबेने सुमारे 192 च्या तुफानी स्ट्राईक रेटने खेळला. दुसरीकडे, सूर्यकुमार बहिणीचा विवाह समारंभ आटोपून फॉर्ममध्य परतत होता. तो येताच 152 च्या स्ट्राईक रेटने खेळला आणि मुंबईच्या विजयात रंग भरला. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील इतर सर्व सामने सूर्यकुमार मुंबईसाठी खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय तो 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळताना दिसेल.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये मुंबई संघाला ई गटात ठेवण्यात आले आहे. या संघाने आतापर्यंत पाच पैकी चार सामने जिंकले असून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या फक्त आंध्र प्रदेशच या टेबलमध्ये वर आहे. साखळी फेरीतील मुंबईचा शेवटचा सामना 5 डिसेंबरला आंध्र प्रदेशशी होणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022-2023 हंगामात मुंबई चॅम्पियन होती.