एमएस धोनी च्या निवृत्तीवर BCCI चे संभाव्य अध्यक्ष सौरव गांगुली याचे मोठे विधान, 'या' दिवशी करणार निवड समितीशी चर्चा
एमएस धोनी, सौरव गांगुली (Photo Credit: Getty)

मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या निवृत्तीबाबतच्या जोरदार चर्चा सुरु आहे. आणि आता बीसीसीआयचे (BCCI) होणारे नवीन अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी धोनीचा निवृत्तीला आपला अजेंडा बनवला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार गांगुलीने बुधवारी सांगितले की, ते धोनीच्या भविष्याबद्दल निवड समितीशी चर्चा करतील. 24 ऑक्टोबरला गांगुलीची निवड समितीसोबत बैठक होईल आणि त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर ते आपले मत प्रदर्शित करतील. गांगुलीचे बीसीसीआय अध्यक्ष होण्याची अधिकृत घोषणा 23 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. त्यानंतर एक दिवसानंतर बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाईल. (BCCI अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुली याने माजी हरभजन सिंह याची मागितली मदत, हे आहे कारण)

कोलकात्यात बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना गांगुली म्हणाले, "मी 24 तारखेला निवड समितीबरोबर बैठक घेईन त्याच्यानंतर मी त्याबद्दल काही बोलेन. निवड समिती काय विचार करीत आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे. यानंतर मी माझे मत व्यक्त करेन." विश्वचषकनंतर धोनी भारतीय संघासोबत नाही आहे. त्याने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेतून माघार घेतली. विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर धोनीने दोन आठवड्यांपर्यंत भारतीय सैन्यात सेवा दिली. गांगुली 24 ऑक्टोबरला कर्णधार विराट कोहली याच्याशी देखील मुलाखत करेल.

दुसरीकडे, बांग्लादेश संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. यादरम्यान, भारत आणि बांगलादेश 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. दोन्ही संघातील ही मालिका 3 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या काही मुख्य फलंदाजांना विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वी धोनीने बांग्लादेशविरुद्ध मालिकेतूनही माघार घेतले असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे, धोनी बांग्लादेशविरुद्ध संघाचा भाग होतो की नाही, यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.