‘या’ 4 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय संघाकडून एकही टी-20 सामना खेळला नाही, पण IPL मध्ये केले टीमचे नेतृत्व; यादीत महान गोलंदाजाचाही समावेश
सौरव गांगुली व करुण नायर (Photo Credit: Getty, Instagram)

इंडियन प्रीमियर लीगने (Indian Premier League) सुरुवातीपासूनच युवा आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय टप्प्यावर जाणण्यास मदत केली आहे. अनेक भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंनी या स्पर्धेचा फायदा घेत क्रिकेटमधील पुढच्या स्तरापर्यंत तयारी केली आहे. फ्रँचायझींनी देखील अनकॅप्ड खेळाडूंना दिग्गजांपेक्षा जास्त पसंती दिल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. कधीकधी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आजच्या या लेखात आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही मात्र त्यांनी आयपीएल (IPL) संघाचे नेतृत्व केले. (T20I आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या ‘या’ 3 दिग्गज खेळाडूंचा पहिला सामना ठरला होता अखेरचा, नावं जाणून बसेल धक्का!)

सौरव गांगुली (Sourav Ganguly)

‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ म्हणून प्रसिद्ध गांगुली भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानले जातात. दादाने एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. मात्र, त्यांनी टीम इंडियाकडून टी-20 क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र आयपीएलमध्ये त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे तर 2012 मध्ये पुणे वॉरियर्स संघाचे नेतृत्व केले होते.

शेन वॉर्न (Shane Warne)

आधुनिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फिरकीपटू असूनही शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियन संघाकडून टी-20 सामना खेळला नाही केला नाही हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटेल. तथापि त्याने राजस्थान रॉयल्ससाठी 55 आयपीएल सामने खेळले. या दिग्गज फिरकीपटूने राजस्थानला 2008 मध्ये पहिले आणि आतापर्यंतचे पहिले विजेतेपद मिळवून दिले.

अनिल कुंबळे (Anil Kumble)

टीम इंडियाचे दिग्गज फिरकीपटू कुंबळे यांनी भारताकडून एकही टी-20 सामना खेळलेला नाही. तथापि 2009 मध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे नेतृत्व केलं होते. 2008 मध्ये देखील ते बंगलोर संघाचे सदस्य होते, परंतु संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर पुढील वर्षी कुंबळेंना कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली, आणि संघाने अंतिम फेरीपर्यंत प्रवेश केला. पण संघाला हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आयपीएलमध्ये कुंबळेंने 42 सामन्यांत 45 विकेट्स घेतल्या आहेत.

करुण नायर (Karun Nair)

2013 मध्ये आयपीएल करिअरची सुरुवात करणाऱ्या करुण नायरला 2017 मध्ये दिल्ली डेयरडेविल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली होती. करुणने देखील आजवर भारताकडून एकही टी-20 सामना खेळलेला नाही.