आर अश्विन याने या दशकात घेतल्या सर्वाधिक विकेट्स, कौतुक करत BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या ट्विटशी तुम्हीही सहमत व्हाल
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे (BCCI) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आज टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरल्याबद्दल अभिनंदन केले. जेव्हा गांगुली अश्विनचे सोशल मीडियावर अभिनंदन करत होते तेव्हा त्याने लिहिले की बर्‍याचदा अश्विनची कामगिरी लक्षात येत नाही. गांगुलीने आयसीसीच्या (ICC) इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट ट्विट करुन या दशकामध्ये अव्वल विकेट घेणाऱ्यांची यादी जाहीर केली. अश्विनने 564 विकेटसह अव्वल स्थान मिळवले आहे. 2019 च्या अखेरीस, हे दशक देखील संपुष्टात येणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याची सर्व बाजूंनी चर्चा होत आहे. या दशकात कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. सध्या तो कसोटी आणि वनडे या दोन्ही स्वरूपात अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत, पण अश्विनने या दशकात सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहे. (वर्ष 2019 मध्ये टीम इंडियाचे वर्चस्व; रोहित शर्मा सह विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांनीही मिळवले पहिले स्थान, वाचा सविस्तर)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) अश्विनच्या कर्तृत्वाविषयी ट्विट केले असता, गांगुलीने ते रिट्विट केले. गांगुलीने ट्विट करत लिहिले की, "आर अश्विनने या दशकात सर्वाधिक विकेट घेतल्या. शानदार प्रयत्न… कधीकधी असे वाटते की त्याची कामगिरी लक्षात घेतली जात नाही. उत्तम प्रदर्शन." आयसीसीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर यावर्षी आंतरराष्ट्रीय विकेट मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या 5 गोलंदाजांची यादी शेअर केली आहे. या यादीत अश्विन पहिल्या स्थानी आहे. इंग्लंडचा जेम्स अँडरसन 535 विकेट्ससह दुसर्‍या स्थानावर, स्टुअर्ट ब्रॉड 525 गडी बाद करून तिसऱ्या, टिम साउथी 472 विकेटसह चौथ्या आणि ट्रेंट बोल्ट याने 458 गडी बाद केले आणि तो पाचव्या स्थानावर आहे.

2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अश्विनने स्वत:ला जगातील सर्वात नामांकित गोलंदाज म्हणून स्थापित केले आहे. त्याने भारताच्या वनडे आणि टी-20 संघात आपले स्थान गमावले असेल तरीही कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे स्थान कायम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 50, 100, 150, 200, 250, 300 आणि 350 विकेट्सचा टप्पा गाठणारा तो वेगवान भारतीय गोलंदाज आहे.