शार्दुल ठाकूरने स्वतःला म्हटले ‘खरा अष्टपैलू’, हार्दिक पांड्या सोबतच्या स्पर्धेवर सोडले मौन; पहा काय म्हणाला
शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/ICC)

‘पालघर एक्सप्रेस’ नावाने प्रसिद्ध मुंबईकर गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) गेल्या काही वर्षात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर स्वतःला एक उत्कृष्ट अष्टपैलू म्हणून सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलिया दौरा असो किंवा इंग्लंड दौरा शार्दुलने असा खेळ दाखवला, ज्या नंतर तो टीम इंडियाचा (Team India) महत्त्वाचा भाग बनला आहे. शार्दुल ठाकूरच्या रूपाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूचा शोधही संपत चालला आहे. ठाकूरने स्वत:ला एक चांगला अष्टपैलू मानण्यास सुरुवात केली आहे, परंतु हार्दिक पांड्याशी (Hardik Pandya) आपले कोणतेही वैर आहे असे त्याला वाटत नाही. ठाकूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या या प्रवासाविषयी सांगितले. वेगवान गोलंदाज शार्दुल सध्या वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तीन वनडे आणि टी-20 सामन्यांसाठी त्याच्या उर्वरित सहकाऱ्यांसह अहमदाबादला पोहोचला आहे. ठाकूर मर्यादित षटकांमध्येही एक अष्टपैलू खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक आहे. (IPL 2022: अहमदाबाद कर्णधार हार्दिक पांड्याला आली MS Dhoni ची आठवण; पुनरागमनाचे दिले संकेत, म्हणाला- ‘अष्टपैलू म्हणून कमबॅक करेन, चूक झाली तर...’)

शार्दुल ठाकूरने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, “मी स्वत:ला खरा अष्टपैलू मानतो. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मला स्वतःला सिद्ध करायचे असते. जेव्हा जेव्हा फलंदाज सातव्या क्रमांकावर धावांचे योगदान देतो तेव्हा ते भागीदारी निर्माण करण्यास मदत करते आणि संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाते. त्यामुळे मोठा फरक पडतो.” शार्दुल ठाकूरची सतत हार्दिक पांड्यासोबत तुलना केली जात आहे. मात्र, हार्दिकचे आपल्याशी कोणतेही वैर नसल्याचे शार्दुलचे मत आहे. शार्दुल म्हणाला, “हार्दिक लवकरच तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल. आमच्या दोघांची फलंदाजीची पद्धत वेगळी आहे. हार्दिक पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मी सात किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यामुळे आमच्यामध्ये कोणतेही वैर नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. मी त्याला जेवढे ओळखतो, त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. तो त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतो. मी पण ते केले आहे. मर्यादित फॉरमॅटमध्ये अधिक अष्टपैलू खेळाडू येत असतील तर ते संघासाठी चांगले आहे.”

याशिवाय विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर शार्दूल ठाकूरने म्हटले की हे सर्व सर्वांसाठी भावनिक क्षण होता. “हा प्रत्येकासाठी भावनिक क्षण होता. तो कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देईल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. त्याच्या नेतृत्वात आम्ही विशेषत: परदेशात चांगली कामगिरी केली. आम्ही परदेशात गमावलेल्या मालिका अटीतटीच्या होत्या. त्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करत होता आणि कोणालाही याची अपेक्षा नव्हती. मात्र आता त्याने आपला निर्णय घेतल्याने सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे.”