ODI डेब्यू सामन्यात भोपळाही फोडू नाही शकले वनडे क्रिकेटचे 'हे' 5 सुपरस्टार्स, नावे करतील हैराण
सचिन तेंडुलकरचे पहिले वनडे शतक (Photo Credit: Twitter/ICC)

भारतीय वनडे क्रिकेट इतिहासात आतापर्यंत एकूण दोनशेहून अधिक खेळाडूंनी पदार्पण केले आहे. यातील बर्‍याच खेळाडूंची कारकीर्द खूप प्रभावशाली राहिली आहे आणि बरेच वर्ष ते भारतकडून खेळले आहेत. परंतु, काही खेळाडूंची कारकीर्द चांगली नसल्यामुळे ते लवकर संघातून बाहेर पडले. जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करतो तेव्हा त्याच्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या बनवून संघात आपले स्थान निर्माण करायचे असते. पण बर्‍याच वेळा खेळाडू त्याच्या पदार्पण सामन्यात भोपळाही न फोडता बाद झाले आहेत. आज आपण वनडे क्रिकेट इतिहासातील अशाच पाच वनडे सुपरस्टार्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे पदार्पण सामन्यात शून्यावर बाद झाले. विशेष म्हणजे या यादीतील पाच खेळाडूंपैकी चार फलंदाज भारतीय फलंदाज आहेत. (नवज्योत सिद्धू यांनी सांगितला 1988 मधील सचिन तेंडुलकरचा 'तो' किस्सा, यामुळे म्हटले जाते क्रिकेटचा देव)

1. सचिन तेंडुलकर

सचिनला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनने आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत रेकॉर्ड-ब्रेक कामगिरी केली आहे. वनडे इतिहासात सर्वाधिक 18,426 धावा करणाऱ्या सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण केलं मात्र, या सामन्यात तो एकही रन न करता शून्यावर बाद झाला.

2. एमएस धोनी

भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार धोनीने 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध पदार्पण केले होते, परंतु या सामन्यात धोनी एकही धाव न करता धावबाद झाला होता. धोनीने 350 वनडे सामन्यात 10,773 धावा केल्या असून तो भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.

3. शोएब मलिक

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने 1999 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शारजाह एकदिवसीय सामन्यात वनडे पदार्पण केलं, पण त्या सामन्यात त्याने फलंदाजी केली नाही.

4. शिखर धवन

2010 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय वन डे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात धवनने वनडे पदार्पण केलं. पण, डावात क्लिंट मॅककेच्या दुसऱ्याच चेंडूवर धवन क्लीन बोल्ड झाला. 290 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियासाठी तो एक मोठा धक्का ठरला पण, विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर संघाने विजय मिळवला.

5. केन विल्यमसन

न्यूझीलंडचा कर्णधार असलेल्या विल्यमसनने ऑगस्ट 2010 मध्ये भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या त्रिकोणी मालिकेच्या एका सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताविरुद्ध त्या सामन्यात विल्यमसनने चौथ्या स्थानावर फलंदाजी केली आणि ब्लॅककॅप्ससाठी पहिली धाव घेण्यापूर्वी प्रवीण कुमारने त्याचा त्रिफळा उडवत माघारी धाडलं.