Wisden Cricketers of The Year: Joe Root विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर; रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तान क्रिकेटपटू देखील सन्मानित; पाहा लिस्ट
जो रूट, जसप्रीत बुमराह व रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

Wisden Cricketers of the Year: भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर (Wisden Cricketers Of The Year) म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोघांनी त्यांच्या घरच्या परिस्थितीत इंग्लंडवर (England) वर्चस्व गाजवल्यानंतर सन्मान मिळवला आहे. भारतीय क्रिकेटचे दिग्गज रोहित आणि बुमराह यांनी गेल्या कॅलेंडर वर्षात भारताला नवीन उंचीवर नेऊन कसोटी क्रिकेटमधील भारताच्या वर्चस्वामागे मजबूत कामगिरी बजावली आले. या दोघांशिवाय न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉन्वे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कर्णधार डेन व्हॅन निकर्क यांचा या यादीत समावेश आहे.

दरम्यान, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) याला विस्डेनचा जगातील आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून घोषित करण्यात आले. रूटने गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. इंग्लंड संघ विजयासाठी संघर्ष करत असताना रूटने एकहाती वर्चस्व गाजवले, ज्यामध्ये सहा शतकांचा समावेश आहे. रूटने गेल्या वर्षी 15 सामन्यात 61 च्या सरासरीने 1708 धावा केल्या होत्या. यामध्ये सहा शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने तीन हजारांहून अधिक चेंडू खेळले होते, मात्र एकदाच तो शून्यावर बाद झाला. दुसरीकडे, भारताच्या इंग्लंड दौऱ्यात बुमराह आणि रोहित यांनी चमकदार कामगिरी केली होती. पहिल्याच कसोटीत बुमराहने नऊ विकेट घेतल्या होत्या आणि टीम इंडिया विजयाच्या जवळ पोहोचली होती, पण पावसामुळे सामना अनिर्णित राहिला. यानंतर त्याने लॉर्ड्सवर अप्रतिम गोलंदाजी केली आणि ओव्हलवर दोन षटकांत ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांना बाद करून संघाला विजय मिळवून दिला. या दौऱ्यात त्याने 18 विकेट घेतल्या. तसेच संपूर्ण दौऱ्यात रोहित भारताचा सर्वोत्तम फलंदाज ठरला. रोहितने त्याच्या स्वभावाविरुद्ध फलंदाजी करत भारताला मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. लॉर्ड्सच्या अवघड खेळपट्टीवर त्याने 83 धावांची शानदार खेळी केली. त्याने या मालिकेत 52 च्या सरासरीने 368 धावा केल्या.

दरम्यान, पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला विस्डेनचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले. त्याने 2021 मध्ये 27 टी-20 सामन्यांमध्ये 1329 धावा केल्या, ज्यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची यंदाची सरासरी 72.88 होती. यादरम्यान, एका वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावा करणारा तो पहिला क्रिकेटर बनला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल ली 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 632 धावा करून जगातील आघाडीची महिला क्रिकेटर ठरली.