Rishabh Pant ला मिळत असलेल्या संधींवर मिळू शकतो ब्रेक, माजी दिग्गजाने केलं मोठं विधान

ऋषभ पंतला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि आगामी मालिकेत त्याला पुन्हा संधी दिली गेली, तर त्यानंतर काय करायचे याचा विचार निवडकर्त्यांना करावा लागणार आहे.

Rishabh Pant (Photo Credit - Twitter)

IND vs NZ 2nd ODI 2022: न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेची (IND vs NZ) सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर, शिखर धवन आणि कंपनी 27 नोव्हेंबर रोजी करो किंवा मरोच्या सामन्यात यजमान संघाशी भिडतील. दरम्यान, संघाचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) चर्चेचा विषय राहिला आहे. टी-20 असो वा वनडे, संघ व्यवस्थापन पंतला भरपूर संधी देत ​​आहे. दरम्यान, भारताचा माजी दिग्गज खेळाडू आकाश चोप्राने (Aakash Chopra) पंतच्या कामगिरीबद्दल आपले मत मांडले आहे आणि त्याला मिळणाऱ्या संधींबाबत इशारा दिला आहे.

पंत त्याच्या प्रतिष्ठेनुसार फलंदाजी करत नाही - आकाश चोप्रा

भारताचा हा माजी दिग्गज खेळाडू पंतबद्दल म्हणाला, 'सध्या प्रत्येकाला ऋषभ पंत हा वेगळा खेळाडू वाटतो. त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे आणि तो एक एक्स फॅक्टर आहे. पण आजपर्यंत तो त्याच्या लौकिकानुसार खेळला नाही. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd ODI Probable Playing 11: टीम इंडियासाठी 'करो किंवा मरो'ची लढाई, काय असु शकते भारताची संभाव्य प्लेइगं 11)

संधींवर मिळू शकतो ब्रेक

तो पुढे म्हणाला, "जर आपण कसोटीबद्दल बोललो तर पंत हा केवळ भारताचा सर्वोत्तम फलंदाज नाही तर जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे." त्याने अनेक अप्रतिम खेळी खेळल्या आहेत. पण एकदिवसीय आणि टी-20 मध्ये त्याची कामगिरी सारखी राहिली नाही हे सत्य आहे. या मालिकेतही पंतला मोठी धावसंख्या करता आली नाही आणि आगामी मालिकेत त्याला पुन्हा संधी दिली गेली, तर त्यानंतर काय करायचे याचा विचार निवडकर्त्यांना करावा लागणार आहे. त्याला पुढे संधी दिली जाईल की अन्य कोणत्या दिशेने विचार केला जाईल.