U-19 World Cup 2020: नसीम शाह याला मोठा धक्का, PCB ने पाकिस्तानच्या विश्वचषक संघातून केले बाहेर
नसीम शाह (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याला आगामी अंडर-19 विश्वचषक (U-19 World Cup) संघातून बाहेर केले असून त्याच्या जागी मोहम्मद वसीम जूनियर (Mohammad Wasim Jr) याचा समावेश केला आहे. वसीम जूनियरने एसीसी आशिया चषक (ACC Asia Cup) आणि दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर प्रत्येकी तीन तर, श्रीलंकेच्या दौर्‍यावर त्याने सात गडी बाद केले. डोमेस्टिक सर्किटमध्ये त्याने एक अंडर-19 वनडे सामना खेळला ज्यामध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या, तर तीन दिवसांच्या तीन सामन्यात त्याने सात गडी बाद केले. पीसीबीचे मुख्य कार्यकारी वसीम खान (Wasim Khan) यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, "आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक भविष्यातील स्टार खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. हे असे व्यासपीठ आहे जिथे उदयोन्मुख खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पदवीधर होतात. नसीमने नुकतीच ही भिंत ओलांडली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून स्वत:ला स्थापित केले आहे. भविष्याचा विचार करून, पीसीबीने पुढच्या वर्षी नसीम शाहला स्पर्धेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याची जागा जागतिक स्तरावर आपली कलागुण दाखवू शकणारा दुसरा तरुण क्रिकेटपटू म्हणून घेण्यात आला." (BCCI कडून U-19 क्रिकेट विश्वचषक 2020 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा)

ते पुढे म्हणाले, "नसीम शाह पाकिस्तानमध्ये राहून गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांच्या देखरेखीखाली आपल्या शैलीवर काम करेल. याशिवाय तो बांग्लादेशविरूद्ध आगामी होम सीरिजसाठी उपलब्ध असेल." यापूर्वी, पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद हाफिज म्हणाला होता की युवा वेगवान गोलंदाज नसीमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळाला असल्याने त्याला आगामी आंतरराष्ट्रीय अंडर-19 विश्वचषकमध्ये पाठवू नये. अष्टपैलूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) जलदगती गोलंदाजाचे योग्य व्यवस्थापन करावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करता येईल असा सल्लाही दिला होता.

2004 आणि 2006 च्या चॅम्पियन आणि तीन वेळा उपविजेताअसलेल्या पाकिस्तान संघाला आगामी अंडर-19 विश्वचषकात ग्रुप सीमध्ये स्थान मिळाले आहे. 19 जानेवारी रोजी पाकिस्तान स्कॉटलंडविरुद्धच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात त्यांच्या मोहिमेला सुरुवात करेल. त्यानंतर तिचा सामना 22 जानेवारी रोजी झिम्बाब्वेशी होईल. पाकिस्तानचा तिसरा आणि अंतिम गट सामना 24 जानेवारीला बांग्लादेशविरुद्ध होईल.