पॉल स्टर्लिंग (Photo Credit: Twitter/@cricketireland)

आयर्लंडचा (Ireland) सलामीवीर पॉल स्टर्लिंगने (Paul Stirling) रविवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावे असलेला विशेष विश्वविक्रम मोडला आहे. यूएई (UAE) विरुद्ध 35 चेंडूत 40 धावांच्या त्याच्या खेळीदरम्यान स्टर्लिंगने चार चौकार ठोकले आणि विराटला मागे टाकत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकारांचा विक्रम आपल्या नावे केला. त्याच्या नावावर आता टी-20 फॉरमॅटमध्ये 288 चौकारांची नोंद झाली आहे, तर विराटने आतापर्यंत 285 चौकार मारले आहेत. तसेच स्टर्लिंगने 2495 धावा केल्या आहेत आणि एकूण 87 षटकार मारले आहेत. कोहलीने 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 षटकार आणि 285 चौकार खेचले आहेत. कोहलीने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3159 धावा आहेत. स्टर्लिंग आणि कोहलीच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे, ज्याने टी-20 क्रिकेटमध्ये 256 चौकार मारले आहेत.

टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा 252 चौकारांसह मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे आणि कांगारू कर्णधार आरोन फिंच पाचव्या क्रमांकावर आहे. गुप्टिलने 102 सामन्यांमध्ये 2939 धावा आणि 256 चौकार व 147 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर भारताच्या रोहितने 111 सामन्यांमध्ये 252 चौकार मारले असून त्याच्या नावावर 133 षटकारांची नोंद आहे. दरम्यान, स्टर्लिंगने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आपल्या देशासाठी सर्वाधिक धावा केल्या असून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

‘यूएई समर टी 20 बॅश 2021’च्या सहाव्या सामन्यात, आज स्टर्लिंग सहकारी फलंदाज केविन ओब्रायनसह सलामीला आला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 11.3 षटकांत 85 धावांची भागीदारी केली आणि संघाला दमदार सुरुवात करून दिली. ब्रायननेही चांगला खेळ दाखवला आणि 45 चेंडूत 54 धावांची दमदार खेळी केली. ब्रायनने आपल्या डावात एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. मात्र, संघाला या उत्कृष्ट सुरुवातीचा फायदा घेता आला नाही आणि त्यांनी निर्धारित षटकांत पाच गडी गमावून केवळ 134 धावाच केल्या. संघाचा कर्णधार अँड्र्यू बालबीर्नी देखील संघासाठी विशेष योगदान देऊ शकला नाही आणि 15 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला.