On This Day in 2017: एमएस धोनी आणि स्टिव्ह स्मिथची जोडीही नाही करू शकली रोहित शर्मावर मात, थरारक सामन्यात तिसऱ्यांदा IPL चॅम्पियन बनली मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Getty)

21 मे, ही तारीख मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) अगदी खास आहे. 2017 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स रोहितच्या नेतृत्वात चॅम्पियन बनली होती. मुंबईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद होते. हैदराबाद येथे खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने रायझिंग पुणे सुपरगिजंटला (Rising Pune Supergiant) अवघ्या 1 धावांनी पराभूत केले. पहिले फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने केवळ 129 धावा केल्या होत्या परंतु कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि एमएस धोनीसारखे (MS Dhoni) फलंदाज असूनही पुणे हे लक्ष्य साध्य करू शकले नाही. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर मुंबईचा कर्णधार रोहितने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु त्याचे दोन्ही सलामी फलंदाज पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स स्वस्तात बाद झाले. मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आणि पुणे सहज सामना जिंकेल असे दिसत होते. (रोहित शर्मा कसा बनला मुंबई इंडियन्सचा कर्णधार? आर अश्विनसोबत लाईव्ह चॅटमध्ये 'हिटमॅन'ने केला खुलासा)

अनुभवी अंबाती रायुडूसुद्धा अवघ्या 12 धावा काढून बाद झाला. कर्णधार रोहित शर्माने 22 चेंडूंत 24 धावा करून अ‍ॅडम झांपाला आपली विकेट दिली. कीरोन पोलार्ड 7 आणि हार्दिक पंड्या अवघ्या दहा धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्ण शर्मा 1 धावांवर बाद झाला. एकेवेळी मुंबई इंडियन्सने 79 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या. तथापि, अष्टपैलू क्रुणाल पंड्याने बॅट दम दाखवून 38 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा केल्याने मुंबईची धावसंख्या 129 धावांवर पोहोचवली. प्रत्युत्तरात पुणे टीमचीही सुरुवात खराब राहिली.

जसप्रीत बुमराहने 3 धावा करून खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीला माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार स्मिथने अजिंक्य रहाणे सोबत प्रभावी फलंदाजी केली आणि 54 धावांची भागीदारी केली. लक्ष्य छोटे असल्याने पुणेची रणनीती विकेट वाचविण्याची होती. पण मिशेल जॉन्सनने रहाणेला 44 धावांवर बाद करून दोघांची भागीदारी मोडली. 17 व्या ओव्हरमध्ये स्मिथ आणि एमएस धोनी फलंदाजी करत असताना काही मोठे शॉट्स खेळण्याची गरज होती. पण बुमराहने धोनी 10 धावांवर आऊट करून मोठे यश मिळवले आणि सामनाच बदलून टाकला. अखेरच्या ओव्हरमध्ये पुणेला 11 धावांची गरज होती आणि कर्णधार स्मिथ खेळपट्टीवर खेळत होता. रोहितने अखेरची ओव्हर जॉन्सनला दिली ज्याने सहा चेंडूत 2 गडी बाद केले. डैनियल क्रिश्चियनने सामना टाय करण्याचा प्रयत्न केला, पण सूचितच्या डायरेक्ट थ्रोने वॉशिंग्टन सुंदर रनआऊट झाला आणि मुंबईने फक्त 1 धावाने सामना जिंकला.