
टी-20 क्रिकेटपेक्षा अधिक थरारक सामने बघायचे असेल तर तयार व्हा. अबुधाबीतील (Abu Dhabi) शेख जाएद स्टेडियममध्ये जगातील एकमेव टी-10 लीगची तिसरी आवृत्ती आजपासून सुरु होत आहे. 15 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत होणार्या या स्पर्धेचा प्रत्येक दिवस क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा 'सुपर डोस' असेल. इथे आपल्याला चौकार आणि षटकारांचा पाऊस, एका मागे एक विकेट पडताना दिसली. क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. एकूण 120 चेंडूंच्या या सामन्यासाठी फलंदाजांसमोर मोठी धावसंख्या करण्याचे, तर गोलंदाजांसमोर रनरेट सांभाळत त्यांचा दोन षटकांचा कोटा पूर्ण करण्याचे आव्हान असेल. आठ संघांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटात विभागले गेले आहेत. इयन मॉर्गन, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, युवराज सिंह, मोईन अली, थिसारा परेरा, हाशिम आमला आणि लसिथ मलिंगा यासारख्या आघाडीचे सध्याचे आणि माजी खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करताना दिसतील. (Abu Dhabi T10 League: अबू धाबी टी10 क्रिकेट स्पर्धेतील आठ सहभागी संघ जाणून घ्या)
आजपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत पहिल्या दिवशी तीन सामने होतील. मराठा अरेबियन्स विरुद्ध उत्तर वॉरियर्स, डेक्कन ग्लेडिएटर्स विरुद्ध दिल्ली बुल्स (Delhi Bulls), टीम अबू धाबी विरुद्ध कलंदर संघ आज आमने-सामने असतील. या संघांचे सामने भारतीय चाहते सोनी सिक्स आणि सोनी टेन 3 या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. शिवाय, एअरटेल टीव्ही, जिओ टीव्ही आणि सोनी लिव्ह या स्पर्धेच्या तिसर्या आवृत्तीचे लाईव्ह ऑनलाईन प्रसारण करणार आहेत. पहिला सामना भारतीय वेळेनुसार 6 वाजता सुरु होईल.
2017 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत केरळ किंग्जने उद्घाटन आवृत्ती जिंकली होती, तर मागील वर्षी नॉर्दर्न वॉरियर्सने ट्रॉफी जिंकली होती. दरम्यान, प्रत्येक संघात एक आयकॉन खेळाडू आहे. या वेळी या स्पर्धेत सर्वांचे लक्ष टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह याच्यावर असेल. युवी पहिल्यांदा या लीगमध्ये सहभागी होणार आहे आणि तो मराठा अरेबियन्सचा आयकॉन प्लेयर आहे.