आर विनय कुमार याने सोडली कर्नाटकाची साथ, दोनदा मिळवून दिले होते Ranji Trophy चे जेतेपद
आर विनय कुमार (Photo Credit: @Vinay_Kumar_R/Twitter)

भारतीय घरगुती क्रिकेटचा अनुभवी वेगवान गोलंदाज आर विनय कुमार (R Vinay Kumar) याने तब्बल 15 वर्षांनंतर कर्नाटक क्रिकेट (Karnataka Cricket) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकचा विनय कुमार रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. विनय आता पुडुचेरी क्रिकेटसह (Puducherry) एक खेळाडू आणि मार्गदर्शक म्हणून रुजू होणार आहे. अनुभवी अष्टपैलू विनय कुमारच्या नेतृत्वाखाली कर्नाटकाने दोनदा रणजीचे जेतेपद मिळवले. कर्नाटकने विनयच्या नेतृत्वाखाली 2013-14 आणि 2014-15 मध्ये रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले होते. आपल्या राज्य अन्य खेळाडूंना संधी देण्यासाठी विनय कुमारने संघ सोडून जात असल्याचे म्हटले आहे. 35 वर्षीय विनयने याबाबाद ट्विटरवरून घोषित केले आणि सर्वांचे आभार देखील मानले.

विनयने आतापर्यंत 130 प्रथम श्रेणी सामन्यांत 459 विकेट्स घेतल्या आहेत आणि रणजी करंडकाच्या इतिहासातील तो सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच, विनयने 2004 मध्ये कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सुनील जोशी नंतर 106 सामने खेळात कर्नाटकचा दुसरा सर्वोच्च क्रमांकाचा खेळाडू आहे. जोशीने 117 सामने खेळले आहेत. विनयने 130 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3025 धावा केल्या असून त्यात दोन शतके आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

2007-08 मध्ये रणजीच्या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा दुसर्‍या क्रमांकाचा गोलंदाज होता. यानंतर 2009-10 च्या हंगामात 46 विकेट्स घेत 11 वर्षांनंतर कर्नाटक संघाला रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहचण्यास मोलाचा वाटा निभावला होता. दुसरीकडे, टीम इंडियासाठी विनयने 31 वनडे सामन्यांमध्ये 38 आणि 9 T-20 सामन्यात 10 विकेट्स घेतले आहेत. भारताकडून त्याने फक्त 1 टेस्ट सामना खेळाला आहे. टीम इंडियाकडून अंतिम सामना 2 नोव्हेंबर 2013 रोजी बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.