IPL 2022 मधून KKR बाहेर पडूनही श्रेयस अय्यर दु:खी नाही, रिंकू सिंहबद्दल म्हणाला, ‘तो हिरो बनू शकला असता पण...’
श्रेयस अय्यर, रिंकू सिंह (Photo Credit: PTI, Twitter)

IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) बुधवारी रात्री लखनऊ सुपर जायंट्सकडून 2 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे केकेआरच्या (KKR) प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नंतर आयपीएल 2022 मधून बाहेर पडणारा कोलकाता हा तिसरा संघ ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने कोलकातासमोर 211 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते, केकेआर संघ निर्धारित 20 षटकात 208 धावाच करू शकला. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 15 चेंडूत 40 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या रिंकू सिंहवर (Rinku Singh) कौतुकाचे पूल बांधले. (IPL 2022, LSG vs KKR: एकच नंबर भावा! Evin Lewis च्या ‘या’ कॅचने बदलला सामन्याचा निकाल, लखनऊच्या झोळीत पाडला दिमाखदार विजय Watch Video)

सामन्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, "मला अजिबात दुःख होत नाही. मी खेळलेल्या क्रिकेटमधील सर्वोत्तम सामन्यांपैकी हा एक होता. आपण ज्या प्रकारे आपले चारित्र्य आणि वृत्ती ठेवली पाहिजे ती सर्वोत्तम होती. रिंकू ज्या प्रकारे खेळला ते आम्हाला पटले. शेवट मला खूप आवडला पण दुर्दैवाने तो बॉलला योग्य दिशा देऊ शकला नाही, तो खूप दुःखी होता. मी अपेक्षा करत होतो की तो आमच्यासाठी सामना पूर्ण करेल आणि हिरो बनेल पण त्याने एक उत्तम खेळी खेळली आणि मी त्याच्यासाठी तिथे होतो मी खूप आनंदी आहे.” रिंकूने 15 चेंडूत 40 धावा करत कोलकात्याला विजयाच्या जवळ नेले. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार मारले. सामन्याच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्कस स्टोइनिसने रिंकूला बाद केले. स्टोइनिसच्या चेंडूवर एविन लुईसने रिंकूचा शानदार झेल घेतला, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

कोलकाता नाईट रायडर्सला हंगामाच्या शेवटपर्यंत त्यांची अचूक प्लेइंग इलेव्हन सापडली नाही. सलामीवीरांपासून ते गोलंदाजी आक्रमणापर्यंत संपूर्ण मोसमात संघाने अनेक बदल केले. आयपीएल 2022 मध्ये सर्वात जास्त बदल करणारा संघ केकेआर हा अव्वल संघ ठरला आहे. या मुद्द्यावर केकेआरचा कर्णधार म्हणाला, “हा मोसम आमच्यासाठी खडतर होता, आम्ही चांगली सुरुवात केली, पण सलग पाच सामने गमावले आणि मला वैयक्तिक वाटते की आम्ही खूप बदल केले आहेत, दुखापत आणि फॉर्ममुळे आम्हाला हे करावे लागले. त्यामुळे आम्हाला रिंकू सारख्या खेळाडूची ओळख झाली.”