IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावापूर्वी आकाश चोप्राची भविष्यवाणी, 7-8 कोटींमध्ये RCB ‘या’ दोन भारतीय खेळाडूंचा पुन्हा ताफ्यात करेल समावेश
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझींसाठी मेगा लिलावापूर्वी खेळाडूंना रिटेन करणे हे सर्वात कठीण काम ठरले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, तर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यासारख्या स्टार खेळाडूंना रिलीज करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. चहल गेल्या 4-5 वर्षात बेंगलोर फ्रँचायझीसाठी सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा होता, तर हर्षलने आयपीएल (IPL) 2021 च्या मोसमात 32 विकेट्स घेऊन RCB साठी पर्पल कॅप पटकावली होती. या दोघांना सोडून देण्यात आरसीबीने (RCB) चूक केली का? हा प्रश्न फ्रँचायझीचे अनेक चाहते विचारत आहेत. यादरम्यान पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव होणार असताना माजी भारतीय क्रिकेटपटू-जाणकार आकाश चोप्रा यांनी सांगितले की आरसीबी दोघांचा सुमारे 7-8 कोटींची रक्कम देऊन पुन्हा आपल्या ताफ्यात समावेश करू शकते. (IPL 2022: विराट कोहलीनंतर ‘हा’ वेस्ट इंडिज धुरंधर सांभाळणार RCB ची कमान? आकाश चोप्राने सुचवले धक्कादायक नाव)

आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चहल आणि पटेल यांना रिटेन न करून आरसीबीने योग्य काम केले का असे विचारण्यात आले. त्याने उत्तर दिले, “हा एक चांगला प्रश्न आहे. त्यांनी त्या दोघांबद्दल विचार केला असता, परंतु ते पुन्हा 7-8 कोटींमध्ये खरेदी करू शकतात का याचा त्यांनी विचार केला असेल. मला वाटते की या दोघांना 7-8 कोटींना परत खरेदी करू शकता.” आरसीबीची पहिली दोन आवड विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल होते तर मोहम्मद सिराज तिसरा होता. चोप्राला वाटते की सिराज आणि हर्षल यांच्यात स्पर्धा झाली असेल, तर फ्रँचायझीने ‘दीर्घकालीन चित्रात’ अधिक योग्य असलेल्या सिराजसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

चोप्राने नंतर या प्रकरणावर एक ठळक विधान केले आणि म्हटले की हर्षल कदाचित युएईमध्ये होता तितका बॅटर-फ्रेंडली पृष्ठभागावर प्रभावी नसेल. चोप्राच्या म्हणण्यानुसार हर्षल आणि चहल दोघांनाही आरसीबीकडून प्रत्येकी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हवी होती. फ्रँचायझीला मात्र ते योग्य वाटले नाही आणि त्यांना रिलीज केले. आता, त्यांना लिलावात कदाचित कमी रक्कम मिळू शकते.