IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावापूर्वी वाढला दीपक हुडाचा भाव, वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामने खेळल्यावर अष्टपैलूची श्रेणी देखील झाली अपडेट
दीपक हुडा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव आता थोड्याच वेळात सुरु होणार आहे. आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction) भारतीय अष्टपैलू दीपक हुडाच्या (Deepak Hooda) खेळाडूंची यादी श्रेणी सुधारित करण्यात आली आहे. खेळाडूंच्या लिलावापूर्वी त्याला कॅप्ड श्रेणीत ठेवण्यात आले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेतून हुडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यासह हुडाची मूळ किंमतही 40 लाखांवरून 75 लाख रुपये झाली आहे. टीम इंडिया (Team India) अष्टपैलू खेळाडू हुडा आता तिसऱ्या सेटचा भाग असेल ज्यामध्ये ड्वेन ब्रावो, जेसन होल्डर, शाकिब अल हसन, मोहम्मद नबी, वॉशिंग्टन सुंदर यासारख्या कॅप्ड अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. (IPL 2022 Mega Auction Live Streaming: आयपीएल खेळाडूंच्या मेगा लिलावाचे लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे व कसे पाहणार?)

हुडा या पूर्वी सेट क्रमांक 8 मध्ये 40 लाखांच्या मूळ किमतीसह अनकॅप्ड खेळाडू म्हणून सूचीबद्ध होता. परंतु आता त्याच्या राष्ट्रीय संघासाठी खेळल्यामुळे त्याला कॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे आणि आता त्याची मूळ किंमत 75 लाख झाली आहे. दरम्यान, लिलावाच्या काही तासांपूर्वी आयपीएलने शुक्रवारी संध्याकाळी खेळाडूंची नवीन यादी फ्रँचायझींना सादर केली, ज्यामध्ये 10 नवीन खेळाडूंचा समावेश होता. याशिवाय 3 ऑस्ट्रेलियन खेळाडू आरोन हार्डी, लान्स मॉरिस, निवेथन राधाकृष्णन, अग्निवेश अयाची, हार्दिक तामोरे, नितीश कुमार रेड्डी, मिहिर हिरवानी, मोनू कुमार, रोहन राणा, साईराज पाटील या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. हार्डी आणि मॉरिस यांनी नुकत्याच संपलेल्या बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्सचे प्रतिनिधित्व केले होते, तर राधाकृष्णन 2022 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. दुसरीकडे, रेड्डी विजयी भारतीय अंडर-19 संघात बदली म्हणून सामील होता.

लीगमध्ये लखनौ आणि अहमदाबादच्या संघांचा समावेश केल्यानंतर यावेळी लिलावात एकूण 10 संघ 590 खेळाडूंवर बोली लावतील. ज्यांना बीसीसीआयने अंतिम यादीत स्थान दिले आहे. लिलावात 590 खेळाडूंपैकी 370 भारतीय आणि 14 देशांतील एकूण 220 विदेशी खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत.