IPL 2021 in UAE: युएई टप्प्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाचे चित्र स्पष्ट, श्रेयस अय्यर की रिषभ पंत, कोणाच्या हाती लागणार निराशा?
रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 in UAE: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) कर्णधारपदाबद्दल सतत चर्चा होत असते. पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) अनुपस्थितीत रिषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली होती आणि त्याच्या नेतृत्वात संघाने पहिल्या टप्प्यात दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या टप्प्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून युएई (UAE) येथे सुरु होणाऱ्या दुसऱ्या पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवावी की पंतलाच कर्णधार म्हणून कायम ठेवावे असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. यादरम्यान आता असे मानले जाते की दुसऱ्या टप्प्यात देखील संघ व्यवस्थापन पंतकडून नेतृत्वाची अपेक्षा करत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस पहिल्या टप्प्यात खेळला नव्हता पण दुसऱ्या टप्प्यापूर्वी आता तो युएई येथे संघात सामील झाला आहे. (IPL 2021 Points Table: आयपीएल 14 च्या युएई लेगची उत्सुकता, पाहा कोणता संघ प्ले-ऑफच्या वाटेवर)

Cricbuzz च्या वृत्तानुसार संघा व्यवस्थापनाला पंतच्या नेतृत्वात पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सने ज्या वेगाने कामगिरी केली आहे त्याबद्दल कोणताही धोका पत्करायचा नाही आहे. 26 वर्षीय श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएल 2020 मध्ये उपविजेता बनला होता. संघ व्यवस्थापनाने अद्याप कर्णधारपदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यासाठी चर्चा सुरु आहे. अय्यर संघात सामील झाला आहे आणि आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याबद्दल खूप उत्साहित आहे. अय्यर सध्या दिल्ली कॅपिटल्स संघासह संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) आहे, तर पंत सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी संघासह आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे आणि पंत या मालिकेचा एक भाग आहे. 14 सप्टेंबर रोजी कसोटी मालिकेचा अंतिम दिवस आहे आणि त्यानंतर भारतीय संघ ब्रिटिश खेळाडूंसह यूएईला रवाना होईल.

यंदा मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळताना श्रेयस जखमी झाला होता. त्यानंतर अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्याला बरे होण्यासाठी सुमारे चार महिने लागले आहेत. अय्यरच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या पंतला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. आणि पंतने देखील विश्वास सिद्ध करत दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यांमध्ये 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्स यंदा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मोठा दावेदार आहे.