आयपीएल (IPL) 14 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून सुरु होत असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी एमएस धोनीच्या सीएसकेला (CSK) दोन मोठे झटके लागले आहेत. त्यांचा फॉर्ममधील सलामीवीर फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) जखमी झाला असून इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत खेळणारा सॅम कुरन (Sam Curran) क्वारंटाईन नियमांमुळे सामन्यातून बाहेर पडला आहे. सॅम कुरन नुकताच यूएईला (UAE) पोहचला आहे आणि आता त्याला 6 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. अशा स्थितीत तो सुरुवातीच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही. सलामीवीर डु प्लेसिस कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जखमी झाला होता. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात तो खेळला नाही. त्याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण आल्याची तक्रार असून ही दुखापत गंभीर असल्याची दिसत आहे. यामुळेच तो सलग दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये बाहेर राहिला. (IPL 2021: आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्रातून अनेक इंग्लिश खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर फ्रँचायझींमध्ये संतापाचे वातावरण, बीसीसीआयला लिहिले पत्र)
सीपीएल 2021 चा अंतिम टप्पा खेळल्यानंतर येणाऱ्या खेळाडूंना - फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर आणि ड्वेन ब्रावो - क्वारंटाईन राहण्याची गरज नसेल कारण ते थेट सीपीएल बबलमधून येणार आहेत. तथापि, भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेनंतर बबल सोडून गेलेला इंग्लिश क्रिकेटपटू सॅम कुरनला 6 दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाईनमधून जावे लागेल. दरम्यान, आयपीएल 14 च्या पहिल्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्स 7 सामन्यांत 5 सामने जिंकून 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये डु प्लेसिसने खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये 64 च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह 320 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 145.45 होता. दुसरीकडे, अष्टपैलू सॅम कुरनने 7 सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने 52 धावा केल्या आणि 8.68 च्या सरासरीने 9 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
#KadaikuttySingam is Home 💛#WhistlePodu #Yellove 🦁 pic.twitter.com/J19JSEPzIi
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) September 15, 2021
आयपीएल 2021 जवळजवळ दोन वर्षांनी पुन्हा एकदा भारतात आयोजित करण्यात आली होती. मात्र स्पर्धेचे 29 सामन्यांनंतर भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरल्यामुळे 4 मे रोजी आयपीएल मध्यंतरी थांबवण्यात आली. पण आता ही मोठी स्पर्धा पुन्हा एकदा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि CSK यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. तसेच या स्पर्धेत इंग्लंड संघातील अनेक खेळाडूंनी माघार घेतली आहे. इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेसाठी 9 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला पोहचणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेसाठी, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल प्लेऑफ सोडून मधल्या टप्प्यात जातील. यामुळे सीएसकेला सर्वाधिक त्रास होणार आहे.